लोकनेते रामशेठ ठाकर यांचे प्रतिपादन
नवी मुंबई : प्रतिनिधी, बातमीदार
नामदेव भगत यांचा आगरी-कोळी महोत्सव हा आता केवळ आगरी, कोळी समाजाचा महोत्सव राहिला नसून या शहरातील विविध जाती-धर्मियांना सोबत घेऊन जाणारा महोत्सव झाला आहे, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी नेरूळ येथे केले. महोत्सवात रविवारी (दि. 13) झालेल्या आगरी, कोळी समाजभूषण पुरस्कार प्रदान सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
व्यासपीठावर शिवसेना उपनेते अनंत तरे, खारी कळवा बेलापूर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मोरेश्वर पाटील, कोळी महासंघाचे अध्यक्ष डॉ. गजेंद्र भानजी, सामाजिक कार्यकर्ते विकास कोळी, नगरसेविका पूनम पाटील, माजी नगरसेविका इंदुमती भगत, उलवे गावच्या सरपंच कविता खारकर, इंटकचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष मिथुन पाटील, सामाजिक कार्यकर्त्या जयर्श्री पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी खारी कळवा बेलापूर शेतकरी संघटनेचे सरचिटणीस अॅड पी. सी. पाटील यांना आगरी समाजभूषण पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
या महोत्सवाच्या माध्यमातून माणूस जोडण्याचे उत्तम कार्य होत असून, नेरूळमध्ये आकाराला आलेले आगरी-कोळी सांस्कृतिक भवन हे याच महोत्सवाचे फलित असल्याचे गौरवोद्गार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी काढले. अनंत तरे, आयोजक नामदेव भगत, गौरवमूर्ती अॅड पी. सी. पाटील यांनीही विचार मांडले. डॉ. उमेश कामतेकर यांच्या लावणी संग्राम या मनोरंजनाच्या कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.