अलिबाग : प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यात निर्माण होणारी आपत्तीजनक स्थिती लक्षात घेऊन जिल्ह्यात एनडीआरएफची टीम कायम तैनात असावी, असा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने शासनासमोर ठेवला आहे. जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी ही माहिती दिली. रायगडसह कोकणाला अनेकदा आपत्तीजनक स्थितीला सामोरे जावे लागते. 2005मधील अतिवृष्टीने दरडी कोसळून झालेली जीवितहानी व 2016मध्ये सावित्री पूल दुर्घटनेत याचा अनुभव आहे. दरवर्षी होणारी अतिवृष्टी, पूर अशा वेळी आपत्ती निवारण यंत्रणेला पाचारण करावे लागते. पुण्याहून एनडीआरएफची टीम यायला किमान तीन तासांचा अवधी लागतो. यावर पर्याय म्हणून रायगड जिल्ह्यात एनडीआरएफची एक तुकडी तैनात असावी, असा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने शासनापुढे ठेवला आहे.
एनडीआरएफची टीम पुणे किंवा मुंबई येथे असते. तिथून येताना होणारा कालापव्यय लक्षात घेता जिल्ह्यात एक तुकडी तैनात असावी. त्यास राज्य शासनाने अनुकूलता दर्शविली असली तरी एनडीआरएफची मान्यता आवश्यक आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे.
-निधी चौधरी, जिल्हाधिकारी, रायगड