Breaking News

माझी हत्या करण्याचा शिवसेनेचा कट होता -किरीट सोमय्या

मुंबई : प्रतिनिधी
पुणे महापालिकेत शिवसैनिकांकडून झालेल्या धक्काबुक्कीनंतर भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी या प्रकरणी चौकशीची मागणी केली असून मुख्यमंत्री कार्यालयाने उत्तर द्यावे असे म्हटले आहे. याशिवाय त्यांनी ट्विटरवर हल्ल्याचा एक व्हिडीओ शेअर केला असून आपल्या हत्येचा कट होता, असा गंभीर आरोप केला आहे तसेच एका मुलाखतीतही याबाबत माहिती दिली.
किरीट सोमय्या यांनी ट्वीट केलेल्या व्हिडीओत त्यांच्या गाडीमागे शिवसैनिक धावत असल्याचे दिसत आहे. या वेळी एका व्यक्तीच्या हातात मोठा दगड होता. हा व्हिडीओ शेअर करताना सोमय्या यांनी म्हटले आहे की, 5 फेब्रुवारी रोजी पुणे महानगरपालिका मुख्यालयात मला मारण्याचा शिवसेनेचा हेतू होता. संलग्न व्हिडिओ क्लिप पहा.
सोमय्या शनिवारी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गेले होते. तिथे त्यांनी जम्बो कोरोना रुग्णालयात घोटाळा झाल्याची तक्रार दिली. तिथून ते महापालिकेत आयुक्त विक्रमकुमार यांना निवेदन देण्यासाठी येणार होते, याची कुणकुण शिवसैनिकांना लागताच सुमारे 100 शिवसैनिक महापालिका आवारात दाखल झाले. सोमय्या गाडीतून उतरून आयुक्तांना भेटण्यासाठी जात असताना शिवसैनिकांनी त्यांना अडवून धक्काबुक्कीला सुरुवात केली. त्यामुळे पायर्‍या उतरताना सोमय्या खाली पडले होते. सोमय्या यांना झालेल्या धक्काबुक्कीबाबत भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
दरम्यान, या संदर्भात पत्रकारांशी बोलताना सोमय्या यांनी सांगितले की, मला शारिरीक इजा फार झालेली नाही, पण उद्धव ठाकरे आणि शिवसेना अशा प्रकारे कट कारस्थान करते. अमिताभ गुप्ता हे तेच पोलीस आयुक्त आहेत ज्यांनी राकेश वाधवानला पळवून लावले होते. सगळे व्हिडीओ पाहिल्यानंतर आणि सीआयएसएफच्या अहवालतही पुणे पोलीस, महापालिकेतील सुरक्षा कर्मचारी आणि शिवसेना हायकमांडने मिळून रितसर कट रचला असल्याचे समोर आले आहे.
मनसुख हिरेन यांची ज्या प्रकारे हत्या करण्यात आली त्याचप्रकारे माझीही हत्या करण्याचा उद्धव ठाकरे सरकारचा प्लॅन होता. त्या शिवसैनिकांना किरीट सोमय्यांचे हात पाय तोडा; दोन-चार महिने उठले नाही पाहिजेत असा आदेश होता, असेही त्यांनी सांगितले.

पुण्यात शिवसेनेच्या गुंडांनी माझ्यावर प्राणघातक हल्ला केला. यासाठी मी उद्धव ठाकरे, संजय राऊत यांना सोडणार नाही. शिवसेनेच्या गुंडांवर कठोर कलमातंर्गत कारवाई करायला लावेन. याचा रिपोर्ट केंद्रीय गृहमंत्रालयाला गुरुवारी देणार आहे. ठाकरे सरकारचे घोटाळे काढूनच मी गप्प बसणार.
-किरीट सोमय्या, भाजप नेते

…म्हणूनच त्यांनी हे ठरवून केले
उद्धव ठाकरे गेल्या 15 दिवसांत प्रचंड अस्वस्थ आहेत. कारण संजय राऊतांच्या निकटवर्तीयांचे सगळे पुरावे सापडले आहेत. अनिल परब यांच्यावर तर कारवाईच सुरू झाली आहे. संजय राऊत, अनिल परब, ठाकरे परिवार आणि रश्मी ठाकरेंच्या भावाचा सहभाग सापडला आहे. म्हणून त्यांनी हे ठरवून केले, असा आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply