
कर्जत : बातमीदार
मावळ लोकसभा मतदारसंघात सोमवारी (दि. 29) होणारे मतदान शांततेत पार पडावे आणि मतदारांनी निर्भयपणे मतदानाचा हक्क बजावावा यासाठी पोलिसांकडून शुक्रवारी (दि. 26) नेरळमध्ये संचलन करण्यात आले.
सोमवारी मावळ लोकसभा मतदारसंघात निवडणूक होत असून मतदानाच्या दिवशी सर्व मतदारांना निर्भयपणे आपला मतदानाचा हक्क बजावता यावा, तसेच वातावरण उत्साही करण्यासाठी पोलिसांकडून शहरी वस्तीत आणि बाजारपेठ भागात संचलन केले जात आहे. शुक्रवारी नेरळ पोलीस स्टेशन हद्दीत रायगड पोलिसांकडून संचलन करण्यात आले. त्यात नेरळ पोलीस ठाण्यामधील कर्मचार्यांसह कर्जत आणि माथेरान पोलीस ठाण्याचे कर्मचारीदेखील सहभागी झाले होते. 150 हून अधिक पोलीस कर्मचारी आणि होमगार्ड यांनी नेरळमध्ये संचलन केले. त्यात सीआरपीएफचे कमांडर आणि राज्य राखीव पोलीस दलाची एक तुकडीदेखील सहभागी झाली होती. सशस्त्र पोलीस संचलन पाहून नेरळमधील मतदार मतदानाच्या दिवशी जास्त संख्येने मतदान करण्यासाठी बाहेर पडतील, असा विश्वास पोलीस उपअधीक्षक अनिल धेरडीकर यांनी व्यक्त केला. 27 एप्रिल रोजी सायंकाळी प्रचार संपल्यानंतर बाहेरील व्यक्तींना हद्दीत थांबता येणार नाही, तसेच जमावबंदी आदेश असल्याने चारपेक्षा अधिक लोकांनी कोणत्याही कारणासाठी गर्दी केलेली चालणार नाही, असे पोलिसांकडून जाहीर करण्यात आले आहे. या संचलनाची शहरात चर्चा सुरू होती.