प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची घोषणा
कोल्हापूर : प्रतिनिधी
राज्यातील एसटी कर्मचार्यांचा संप संपेपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातील अडीच हजार एसटी कर्मचार्यांची चुल पेटवण्याची जबाबदारी भाजपा घेत आहे, अशी घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी रविवारी (दि. 16) कोल्हापुरात केली. एसटी कर्मचार्यांच्या आंदोलनस्थळी चंद्रकांत पाटील यांच्यासह जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी यांनी भेट दिली. या वेळी एसटी कर्मचार्यांना प्रातिनिधिक स्वरूपात शिधा वाटप करण्यात आला.
हा संदर्भ घेऊन चंद्रकांत पाटील यांनी संपात उतरलेल्या सर्व कर्मचार्यांना संप सुरू असेपर्यंत शिधा देण्याची जबाबदारी भाजप घेत असल्याचे घोषित केले. हा संप लवकरच संपुष्टात यावा, कर्मचार्यांनी स्वाभिमानाने कामावर जावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
एसटी कर्मचार्यांचा संप संपुष्टात आणण्यात राज्य शासन अपयशी ठरत असल्याबद्दल आमदार पाटील यांनी टीकेची झोड उठवली. राज्यात महाविकास आघाडीचे सत्ता आल्यापासून हैदोस सुरू आहे. यांचे काही तरी नक्की होणार. अंबाबाई जागी होईल आणि काहीतरी चांगले करेल, असे साकडे त्यांनी देवीला घातले.
शिधावाटप झाल्यामुळे कर्मचार्यांना मोठा आधार मिळाला. काही कर्मचार्यांनी सरकार आमच्या रक्ताने थंड होणार असेल तर त्यासाठी आहुती देण्यास तयार आहे, असे डोळ्यात अश्रू आणून सांगितले. त्यावर आमदार पाटील यांनी त्यांची समजूत काढली. शासनाशी भांडू आणि न्याय मिळवू; परंतु हिंसाचार करू नका, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी आणली. 19 महिन्यांच्या कालावधीत अनेकांना तुरुंगात घातले. माझ्या सासर्यांनाही तुरुंगवास सोसावा लागला. अशा परिस्थितीत पत्नीने नेटाने घर सांभाळले. अनेकांनी घर सावरण्याचा प्रयत्न केला. आणीबाणी लादण्याचा परिणाम म्हणून इंदिरा गांधींना पराभूत व्हावे लागले. जनता पक्षाचे सरकार आले. त्यातून हम करे सो कायदा या देशात चालत नाही असेही दिसून आले आहे. त्यामुळे राज्य सरकारची ताठर भूमिका जास्त काळ चालणार नाही. आंदोलन लवकरच संपुष्टात येईल, अशी अपेक्षाही आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.