खोपोली, खालापूर : प्रतिनिधी
बंद पडलेल्या टँकरचा मुसळधार पावसात अंदाज न आल्याने दुचाकिची मागून जोरदार धडक बसल्याने रविंद्र ठोंबरे (32, रा. कोपरी चौक, खालापूर)जागीच ठार झाल्याची घटना रविवारी जुन्या मुंबई-पूणे महामार्गावर खालापूर हद्दीत दुपारी घडली. मिळालेल्या माहितीनुसार, रविंद्र दुचाकिवरून चौकहून पनवेलच्या दिशेने जात होते. नढाळ गावाच्या हद्दीत बंद पडलेला टँकर जवळ चालकाने कोणत्याही प्रकारची सूचना तसेच मागून येणार्या वाहन चालकासाठी खबरदारीसाठी उपाययोजना केली नव्हती. मुसळधार पावसात रविंद्र यांना टँकरचा अंदाज न आल्याने दुचाकिची जोरदार धडक टँकरला बसली. या अपघातात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने रविंद्र यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच चौक पोलीस दूरक्षेत्रचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय बांगर, पोलीस नाईक खंडागळे घटनास्थळी पोहचले. रविंद्र ठोंबरे यांचा मृतदेह चौक ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.