Breaking News

कोरोनावर मात केलेल्या रुग्णांना प्रकृतीच्या समस्या

उपचारांबाबत मार्गदर्शक तत्त्वे नसल्याने अडचण

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त – कोरोनावर मात केलेल्या रुग्णांना उपचारानंतर प्रकृतीच्या इतर समस्या जाणवत आहेत. त्यामध्ये दीर्घकाळ अशक्तपणा, मानसिक तणाव यासह उच्च रक्तदाबाच्या समस्या समोर येत आहेत, परंतु अशा समस्यांवर उपचारांबाबत मार्गदर्शक तत्त्वे नसल्याने अनेकांपुढे अडचणी निर्माण होत आहेत.

कोरोनाची लक्षणे समोर येताच खासगी रुग्णालयात अथवा पालिकेच्या कोविड सेंटरमध्ये उपचार घेऊन आल्यानंतर, पुढील पाच ते दहा दिवसांत त्यांच्यातही लक्षणे आढळून येत आहेत. ज्यांना यापूर्वी प्रकृतीच्या समस्या नव्हत्या, त्यांनाही अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू लागल्या आहेत. त्यात भीती वाटणे, अपचन व मानसिक तणाव या समस्या प्रामुख्याने आढळून येत आहेत. यामुळे कोरोनावर मात करून आल्यानंतरही त्यांना रुग्णालयाच्या फेर्‍या माराव्या लागत आहेत, परंतु कोरोना होऊन गेलेला असल्याने अशा रुग्णांना हाताळण्यात खासगी डॉक्टर संभ्रमावस्थेत आहेत.

समोर येत असलेली लक्षणे कोरोनाचीच आहे की सामान्य, याचा उलगडा सहज करणे डॉक्टरांना शक्य नाही. त्यामुळे अशा कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांमध्ये दिसणार्‍या लक्षणांवर उपचार काय करायचे, असाही प्रश्न त्यांना भेडसावत आहेत. एखाद्या रुग्णाला दाखल करून घ्यायचे झाल्यास, त्याकडे संशयित कोरोना रुग्ण म्हणूनच पाहून स्वतंत्र उपचार यंत्रणा उभारावी लागत आहे. परिणामी, कोरोनातून मुक्त झाल्यानंतरही अनेक जण इतर दुखण्यांमुळे खासगी रुग्णालयात दाखल होऊन उपचार घेत आहेत.

सद्यस्थितीला पालिकेचे साधारण रुग्णालय बंद असून, केवळ कोविड सेंटर चालविण्यावर जोर देण्यात आलेला आहे. त्या ठिकाणी कोरोना रुग्णावर उपचारासाठी वापरल्या जात असलेल्या गोळ्यांनी अनेकांमध्ये प्रचंड अशक्तपणा निर्माण होत आहे. तर दहा दिवसांनी या रुग्णाला घरी सोडताना पुढील काही दिवस अशक्तपणा राहणार असून, भीती वाटल्यासारखे होईल, याचीही कल्पना दिली जात आहे, परंतु उपचारासाठी वापरल्या जाणार्‍या गोळ्यांनी पचनप्रक्रिया बिघडत असल्याने अशक्तपणा वाढत आहे. अशातच श्वास अडकणे, हृदयात धडकी भरणे अशी समस्या समोर येऊ लागल्याने भयभीत होणार्‍या कोरोनामुक्त रुग्णांना नाइलाजास्तव पुन्हा खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागत आहेत.

कोरोनावरील उपचारानंतर त्यांना भेडसावणार्‍या समस्या कोरोनामुळे की उपचारामुळे निर्माण होत आहेत, याबाबत डॉक्टरांमध्ये संभ्रम अवस्था आहे. इतर आजारांमध्ये उपचारानंतरही पुढील काही दिवस त्यांची चौकशी केली जाते. मात्र, कोरोनाच्या बाबतीत एकदा उपचार केल्यानंतर पुन्हा फॉलोअप घेतला जात नसल्याची खंत व्यक्त होत आहे. सध्या पालिकेच्या कोविड सेंटरमधून उपचार घेऊन आलेल्या रुग्णाला दहा दिवसांनी फोन करून केवळ चौकशी करण्याचे काम होत आहे. कोरोनानंतर समोर येणार्‍या इतर समस्यांवरही उपचारासाठी प्रशासनाने यंत्रणा उभी करण्याची मागणी होऊ लागली आहे.

कोरोनातून मुक्त झालेले अनेक जण आरोग्याच्या विविध समस्या घेऊन येत आहेत. इतर आजारांवर ज्याप्रकारे उपचारात फॉलोअप घेतला जातो, तसा कोरोना रुग्णांवर घेतला जाणे आवश्यक आहे. याबाबत दोन महिन्यांपूर्वीच तत्कालीन आयुक्तांना कळवण्यात आले होते. विद्यमान आयुक्तांनाही संघटनेमार्फत तसे कळवले जाणार आहे.

-डॉ. प्रतीक तांबे, हिम्पाम, महाराष्ट्र सहसचिव तथा, नवी मुंबईचे अध्यक्ष

कोरोनाबाबत लोकांमध्ये अनेक गैरसमज असल्याने भीती आहे. अशातच उपचारानंतर येणार अशक्तपणा व उद्भवणार्‍या इतर समस्या याचा परिणाम मानसिकतेवर उमटत आहे. यामुळे सतत भीती वाटणे, मानसिक संतुलन हरपणे अशा समस्यांचे रुग्ण समोर येऊ लागले आहेत. त्यांना उपचारासह धीर देण्याची गरज आहे.

-डॉ. अंजली पाटील, मानसोपचारतज्ज्ञ

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply