सेवेस देण्यात आलेली तात्पुरती स्थगिती उठविली
मुंबई ः प्रतिनिधी
राज्य परिवहन महामंडळात 2019मध्ये सरळसेवा भरती अंतर्गत सेवेत दाखल झालेल्या चालक-वाहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या कर्मचार्यांच्या सेवेस देण्यात आलेली तात्पुरती स्थगिती उठवण्यात आली आहे. त्यामुळे साडेचार हजार कर्मचार्यांच्या नोकर्यांवरील संकट तूर्तास दूर झाले आहे.
कोरोनामुळे लॉकडाऊन लागू करण्यात आल्याने राज्य परिवहन महामंडळाची बससेवा पूर्णपणे ठप्प झाली. त्यामुळे एसटीचा प्रवासी सेवा हा उत्पन्नाचा प्रमुख मार्ग बंद झाला. लॉकडाऊन लांबत चालल्याने एसटी महामंडळाने जुलैमध्ये एक निर्णय घेत कर्मचार्यांना मोठा धक्का दिला. साडेचार हजार कर्मचार्यांच्या नोकर्यांवर गदा आणणारा हा निर्णय होता.
सरळसेवा भरतीतील कर्मचार्यांच्या सेवा तात्पुरत्या खंडित करण्यात आल्या होत्या. आता एका आदेशाद्वारे हा निर्णय रद्द करण्यात आला. कर्मचार्यांची खंडित करण्यात आलेली सेवा पूर्ववत करण्यात यावी व गरजेनुसार नियमित वेतनश्रेणीवरील चालक-वाहकांचाच वापर करावा, असे आदेशात नमूद करण्यात आले. अनुकंपा तत्त्वावरील उमेदवारांच्या प्रशिक्षणास दिलेली स्थगितीही उठवण्याचा निर्णय घेण्यात आला. एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष शेखर चन्ने यांनी हा आदेश जारी केला आहे.