Breaking News

हजारो नागरिकांनी टाळला गणेशोत्सव

नवी मुंबई : बातमीदार

नवी मुंबईत यंदाच्या गणेशोत्सवावरदेखील कोरोनाचे सावट असल्याचे आकडेवारीवरून सिद्ध झाले आहे. अनेकांनी उत्सव साजरा केला नसल्याचे दिसून आले. 2019-20 घरगुती व सार्वजनिक मिळून 34 हजार 006 मूर्तींचे विसर्जन  करण्यात आले तर यंदा हीच संख्या 22 हजार 381 पर्यंत सीमित राहिली. तब्बल 11 हजार 625 नवी मुंबईकरांनी कोरोनामुळे विविध कारणास्तव गणेशोत्सव साजरा केला नाही.  

नवी मुंबई पालिकेने केलेली योग्य जनजागृतीदेखील गर्दी टाळण्यासाठी प्रभावी ठरल्याचे दिसून आले. अनेकांनी पाच व 10 दिवसांचा कालावधी कमी करत दीड दिवसासाठी गणेशाची स्थापना करण्यास पसंती दिली. दर्शन घेणे टाळले मात्र ऑनलाइन आरतीत सहभागी होत गौरी गणपतीचे दर्शन अनेकांनी घेतल्याचे दिसून आले. अनेकांनी शाडूची मूर्ती आणण्याचे टाळत धातूची मूर्ती यंदा स्थापन केली होती. लहान मातीच्या मूर्तीची स्थापना करत घरातच विसर्जन केले. कोरोनामुळे आर्थिक नियोजन न जमल्याने व गर्दी टाळण्यासाठी 300 पेक्षा जास्त सार्वजनिक मंडळांनी यंदा उत्सव साजरा केला नाही. कंपन्याच बंद असल्याने यंदा उत्सव साजरा केला गेला नाही. अनेक सोसायट्यांनीदेखील यंदा सार्वजनिक गणेशोत्सव टाळला. कोरोनामुळे अनेक कुटुंबच्या कुटुंब उपचार घेत आहेत. त्यामुळे अनेक कुटुंबीयांना नाईलाजास्तव इच्छा असूनही गणेशाची स्थापना करता आली नाही. काही जणांच्या घरात कोरोनाने नातेवाइकांचे निधन झाल्याने दुखवटा म्हणूनही हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे गणेशाची स्थापना केली नाही.

कित्येक कुटुंबात फिरता गणेशोत्सव साजरा केला जातो. मात्र नवी मुंबईतील अशा अनेक कुटुंबांनी यंदा गावी असलेल्या आपल्या इतर नातेवाइकांना गणेशाची स्थापना करण्यास सांगितल्याचे दिसून आले. एकूणच कोरोना संकटकाळाचा फटका नवी मुंबईत गणशोेत्सवाला बसलेला दिसून आला. त्यामुळे तब्बल 11 हजार 625 जणांनी यंदा विविध कारणांनी गणेशोत्सव करण्याचे टाळल्याचे दिसून आले.

Check Also

‘हिंद दी चादर’ गुरू तेग बहादूर यांचा 350वा शहिदी समागम

दोन दिवसीय भव्य कार्यक्रमासाठी खारघर सज्ज पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी …

Leave a Reply