सांगली : प्रतिनिधी शासकीय, वैद्यकीय क्षेत्रासह आता राजकीय क्षेत्रालाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. सांगली जिल्ह्यातील सात आमदार, तीन माजी आमदार, एक माजी खासदार असे डझनभर नेते कोरोनाबाधित झाले आहेत. जिल्ह्यात आमदार सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ, अनिल बाबर, विक्रम सावंत, मोहनराव कदम, सदाभाऊ खोत, सुमनताई पाटील हे सात आमदार कोरोनाबाधित झाले आहेत. याशिवाय माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार संभाजी पवार, नितीन शिंदे, राजेंद्रअण्णा देशमुख, काँग्रेस नेत्या जयश्री पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित आर. आर. पाटील हेसुद्धा बाधित झाले आहेत. त्यामुळे राजकीय क्षेत्राला कोरोनाने कवेत घेतल्याचे चित्र दिसत आहे. अनेक कार्यकर्तेही पॉझिटिव्ह येत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून सांगलीत कोरोनाच्या संकटकाळात मास्क, सॅनिटायझर, औषध वाटप करण्यासाठी सर्वपक्षीय राजकीय नेते काम करीत आहेत. पक्षांच्या बैठका, आंदोलने, शासकीय नियोजन बैठका यांनाही ते उपस्थित राहत होते. यातून त्यांना कोरोनाची लागण झाली. या नेत्यांबरोबर काही कार्यकर्तेही बाधित झाले असल्याने राजकीय क्षेत्र सध्याक्वारंटाइन झाल्याच्या स्थितीत आहे. दरम्यान, आमदार मोहनराव कदम, सुधीर गाडगीळ व सुरेश खाडे कोरोनामुक्त झाले असून, आणखी काही दिवस त्यांना घरातच विलगीकरण करून घ्यावे लागणार आहे. राजकीय नेत्यांसह त्यांचे कुटुंबीय, वाहनचालक, कार्यकर्ते यांनाही संसर्ग झाला आहे. राजकीय क्षेत्रातील बाधितांची वाढती संख्या चिंताजनक आहे. त्यामुळे सांगलीचे राजकीय क्षेत्रसुद्धा आता कोरोनाचे हॉटस्पॉट बनल्याचे दिसत आहे.
Check Also
भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …