अनलॉक ही देशाची आर्थिक अपरिहार्यता होती आणि आहे. लॉकडाऊनचा देशाच्या अर्थव्यवस्थेला इतका जबर फटका बसला आहे की अर्थव्यवस्थेला हातभार लावण्यासाठी अनलॉक आणि अनेक विशेष मदत योजनांची गरज आहेच. पण याचा अर्थ जर कुणी कोरोना महामारी संपुष्टात आली असा घेत असेल तर ते भीषण महासंकटाला आमंत्रण देणारे ठरू शकेल.
कोरोनामुळे जगभरात उद्भवलेली महामारी आणि पाठोपाठ नेहमीच्या जगण्यावर आलेले निर्बंध याला एव्हाना सारेच पुरते कंटाळले आहेत. नुकतीच घोषित झालेली अनलॉक 4ची नवी नियमावली त्यामुळेच लोकांना मोठी दिलासादायक वाटली. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मुंबई व आसपासच्या परिसरात रस्त्यावरील वाहतूक जवळपास पूर्वीसारखी झाल्यासारखे चित्र दिसू लागले. ज्या उत्कंठेने लोक आता काय-काय खुले झाले आहे आणि लवकरच काय खुले होणे अपेक्षित आहे याकडे लक्ष देत आहेत, तितके ते देशातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येकडे लक्ष देताना दिसत नाहीत. सप्टेंबरमध्ये मोठ्या प्रमाणात जनव्यवहार सुरू झाले आहेत. कित्येकांना आता याहून अधिक कळ सोसणे शक्य देखील नाही. निम्नमध्यमवर्गीयांंपैकी अनेकांनी त्यामुळेच काहिशा बेदरकारपणे बाहेर पडणे सुरू केले आहे. मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे, वरचेवर हात धुण्याची दक्षता घेणे या सवयीही पाठोपाठ निकालात निघत आहेत. अनलॉक 4च्या नियमावलीच्या घोषणेपाठोपाठ देशाचे कोविड-19 रुग्णांच्या संदर्भात नित्यनवीन विक्रमी संख्या गाठणेही सुरू आहे. दुर्दैवाने अन्य काही रहस्य-रंजक बातम्यांच्या समोर या आकडेवारीच्या बातम्या फिक्या पडत आहेत. एका दिवसातील सर्वाधिक केसेसचा विक्रम भारताने जागतिक स्तरावर केव्हाच मोडीत काढला आहे. कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांच्या यादीत सोमवारी आपण ब्राझीलला मागे टाकून दुसर्या क्रमांकावर पोहचलो. एकूण रुग्णसंख्येत अमेरिका अद्याप आपल्या बरीच पुढे आहे. अमेरिकेची रुग्णसंख्या 62 लाख 72 हजाराच्या पुढे आहे तर भारत 42 लाखांच्या पुढे गेला आहे. रुग्णसंख्येत प्रति दिन होणारी वाढ मात्र भारतातच जबरदस्त दिसते. शनिवारी भारतातील रुग्णसंख्या तब्बल 90 हजारांनी वाढली. रुग्णसंख्येचा चढता आलेख अमेरिकेत केव्हाच सपाट झाला आहे. आपल्याकडे मात्र रुग्णसंख्या अद्यापही वेगाने वाढताना दिसते. तज्ज्ञांच्या मते, अमेरिकेने महामारीची दुसरी लाटही यशस्वीरित्या आटोक्यात आणली आहे, तर आपल्याकडे अद्याप आपण पहिल्या लाटेचे शिखरही गाठलेले नाही. काही तज्ज्ञांच्या मते भारतातील रुग्णसंख्या बहुदा मार्चपर्यंत अशीच वाढत राहील. देशाच्या महानगरांमध्ये तिथल्या अद्ययावत आरोग्यविषयक सुविधांमुळे साथीला आटोक्यात ठेवण्यात काही प्रमाणात यश आले असले तरी आता ही महामारी निमशहरी व ग्रामीण भागात पसरताना दिसू लागली आहे. तिथली आरोग्यसुविधांची परिस्थिती अतिशय बिकट असल्याने तिथे महामारीला आटोक्यात आणणे कठीण जाईल अशी चिंता तज्ज्ञांना सतावते आहे. अर्थात जागतिक स्तरावरील मृत्यूदराशी तुलना करता, आपला मृत्यूदर कमी राखण्यात भारताला सलगपणे यश आले आहे ही आपली सगळ्यात मोठी जमेची बाजू आहे. परंतु त्याचा अर्थ आपल्याकडील सर्वसामान्य लोक हा काही तितकासा गंभीर आजार नाही असा काढत आहेत हे मात्र चुकीचे आहे. कोरोना भारतात वेगाने पसरतोच आहे, त्याला रोखण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने संपूर्ण दक्षता बाळगणे आजही एप्रिलइतकेच आवश्यक आहे.