पनवेल ः बातमीदार
नुकतीच मुंबईत पोलीस मुख्यालयात प्रशिक्षण विभागात बदली झालेले नवी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय कुमार यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्या वाहनचालक व त्यांच्या समवेत राहणार्या अन्य एका कर्मचार्याला कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यानंतर त्यांनीही तपासणी केली होती. यात संजय कुमार यांचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 3 सप्टेंबर रोजी त्यांनी पदभार सोडल्यानंतर दुसर्याच दिवशी त्यांचा कोरोनाचा अहवाल आला. त्यामुळे त्यांनी त्यांच्या निरोपाच्या कार्यक्रमात उपस्थित असलेल्यांना काळजी घेण्याचा सल्लाही दिल. संजय कुमार यांनी स्वत:ला कोरोनाची लागण झाल्याची माहिती ट्विटरवरून दिली आहे.
संजय कुमार यांची नुकतीच बदली झाली असून त्यांच्या कार्यकाळात त्यांनी चांगली कामगिरी केली आहे. त्यांचे नवी मुंबईत स्वागतच दंगलीच्या घटनेने झाले होते, मात्र त्यांनी केवळ तीन दिवसांतच दंगलीची परिस्थिती नियंत्रणात आणली होती. नेरूळ येथून अपहरण प्रकरणाचा तपासही पोलिसांसाठी मोठे आव्हान होते. कुठलेही धागेदोरे नसताना या प्रकरणातील चार आरोपींना अटक करण्यात आली होती, तर कोरोना काळात स्वस्त धान्य दुकानातून तांदूळ निर्यात करणार्या टोळीला त्यांनी अटक केली आहे. यांसह अनेक महत्त्वाच्या गुन्ह्यांचा तपास त्यांच्या कार्यकाळात झाला.