
पनवेल ः बातमीदार
खारघर येथील मोबाइल शॉपमध्ये घरफोडीप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. तिघेही सराईत गुन्हेगार असून, त्यांच्याकडून 45 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चोरी केलेले मोबाइल परराज्यात मागणीनुसार पाठविले जाणार होते.
खारघर येथे मोबाइल शॉप फोडल्याचा गुन्हा 30 ऑगस्टला घडला होता. गॅस कटरने शटर कापून दुकान लुटण्यात आले होते, तर गुन्ह्यानंतर त्या ठिकाणच्या सीसीटीव्हीचा डीव्हीआरदेखील चोरण्यात आला होता. त्यामुळे गुन्हेगारांची माहिती पोलिसांना कळू शकली नव्हती. या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने खारघर पोलीस व गुन्हे शाखा पोलीस तपास करीत होते. या गुन्ह्यात 50 लाखांच्या जवळपास किमतीचे मोबाइल चोरीला गेले होते. त्यानुसार गुन्हे शाखा प्रभारी उपायुक्त सुरेश मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक एन. बी. कोल्हटकर, सहाय्यक निरीक्षक ज्ञानेश्वर भेदोडकर, राजेश गज्जल, निलेश तांबे, संजय पवार, पोपट पावरा, विष्णू पवार, सचिन घनवटे, विजय पाटील आदींचे पथक तयार करण्यात आले होते.
या पथकाकडून घरफोडीच्या गुन्ह्यात सक्रिय असणार्या गुन्हेगारांची माहिती मिळविली जात होती. यादरम्यान गॅस कटरने शटर कापून घरफोडी झाल्याच्या कुर्ल्यामधील एका गुन्ह्याचा आढावा वरिष्ठ निरीक्षक कोल्हटकर यांनी घेतला. या वेळी समोर आलेल्या माहितीच्या आधारे काही संशयितांची नावे समोर आली. त्याआधारे मुंबईच्या वेगवेगळ्या ठिकाणावरून तिघांना अटक करण्यात आली. शफिकउल्ला उर्फ सोनू अतिकउल्ला (24), अयान उर्फ निसार उर्फ बिट्टू रफी अहमद शेख (28) व इम्रान मोहम्मद उर्फ इम्मू बिंदू अन्सारी (25) अशी त्यांची नावे आहेत. शफिकउल्ला हा टोळीचा म्होरक्या असून तिघेही सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्याकडून 45 लाख रुपयांचे चोरीचे मोबाइल व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.
घटनेच्या दिवशी त्यांनी कुर्ला येथून एक कार चोरली होती. याच कारमधून गॅस कटर घेऊन ते खारघर येथे आले होते, अशी माहिती पोलीस आयुक्त बिपिनकुमार सिंग यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी सहआयुक्त जय जाधव, उपायुक्त सुरेश मेंगडे, सहाय्यक आयुक्त विनोद चव्हाण, वरिष्ठ निरीक्षक एन. बी. कोल्हटकर आदी उपस्थित होते.
या टोळीचे राज्याबाहेर चोरीचे मोबाइल खरेदी करणार्यांसोबत संपर्क आहेत. त्यांना ज्या प्रकारच्या मोबाइल अथवा टॅबची मागणी असेल त्या प्रकारे ते घरफोडी करायचे. त्यानुसार या गुन्ह्यात इतरही अनेकांचा सहभाग असण्याची शक्यता आहे. त्यानुसार गुन्हे शाखा पोलीस अधिक तपास करीत आहेत.