Breaking News

राजिपची सभा काही मिनिटांतच आटोपली; व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये उडाला सावळागोंधळ

अलिबाग : प्रतिनिधी

रायगड जिल्हा परिषदेच्या बुधवारी (दि. 9) व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घेण्यात आलेल्या ऑनलाइन सभेत तंत्रज्ञानातील त्रुटींमुळे गोंधळ उडाला. या वेळी सदस्यांचा अधिकार्‍यांशी संपर्क होत नव्हता. त्यामुळे ही सभा काही मिनिटांमध्येच आटोपण्यात आली. राजिपची अर्थसंकल्पीय सभा 11 मार्च 2020 रोजी झाली होती. त्यानंतर 10 जून रोजी सभा आयोजित करण्यात आली होती, परंतु कोविड-19मुळे ही सभा तहकूब करण्यात आली. सहा महिन्यांत राजिपची सभा झाली नाही. कायद्याने सप्टेंबर महिन्यात सभा होणे आवश्यक होते. त्यामुळे कै. ना. ना. पाटील सभागृहात झूम इन अ‍ॅपच्या माध्यमातून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सभा घेण्यात आली. राजिपचे उपाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या या सभेस बांधकाम सभापती अ‍ॅड. नीलिमा पाटील, विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे, मुख्य कार्यकारी अधिकारी किरण पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मंडलिक, शीतल पुंड सभागृहात उपस्थित होते, तर इतर सदस्य व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सभेत सहभागी झाले होते. सभा सुरू झाली आणि सोबतच तंत्रज्ञानातील त्रुटींमुळे गोंधळही सुरू झाला. कोण काय बोलतंय हेच समजत नव्हते. सभागृहात उपस्थित असलेले अधिकारी काय बोलताहेत हे व्हिडीओ कॉन्फरन्सने जोडलेल्या सभासदांना ऐकू जात नव्हते. बांधकाम सभापती अ‍ॅड. नीलिमा पाटील व विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे हे सदस्यांना शांत राहण्याचे आवाहन करीत होते, परंतु कुणाला काही ऐकू येत नव्हते. त्यामुळे सभेत गोंधळ सुरू होता. ही सभा तहकूब करा, अशी मागणी सदस्य करीत होते. अखेर मुख्य कार्यकारी अधिकरी किरण पाटील यांनी कायद्याने सलग दोन वेळा सभा तहकूब करता येत नाही. ही सभा होणे तसेच काही विषयांना मंजुरी मिळणे आवश्यक आहे, असे स्पष्ट केले.सभा तहकूब करता येणार नाही. या सभेत महत्त्वाच्या विषयांना मंजुरी देऊन  उर्वरित विषय ऑक्टोबर महिन्यात होणार्‍या सभेत घेऊ, असे अ‍ॅड. पाटील यांनी सांगितले. गोंधळातच विषयपत्रिकेवरील विषय वाचून मंजूर करण्यात आले. त्यानंतर काही मिनिटांमध्येच ही सभा आटोपती घेण्यात आली.

आजच्या सभेत आम्हा पनवेलमधील सदस्यांना अलिबाग येथील मुख्य सभागृहातून कोण काय बोलतंय याचा आवाज ऐकू येत नव्हता. वारंवार प्रयत्न करूनही हीच परिस्थिती कायम असल्याने आम्ही सभा रद्द करण्याची मागणी केली, मात्र तरीही सभा पुढे रेटली गेल्याने कार्यवाही होण्यापूर्वीच आम्ही सभात्याग केला. -अमित जाधव, भाजप प्रतोद

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply