
उरण : प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या 21 दिवसांचे लॉक डाऊन व घराबाहेर पडण्यास मनाई करण्याच्या आवाहनानंतर उरण परिसरातील काही गावांतील ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी स्वयंस्फुर्तीने गावबंदी लागु केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही राज्यभरातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता 21 दिवसांचा लॉक डाऊनच्या आवाहनाला नागरिकांनी घराबाहेर न पडता प्रतिसाद देण्याची विनंती केली आहे. या आवाहनाला प्रतिसाद देण्यासाठी उरण तालुक्यातील काही गावांतील ग्रामपंचायती स्वयंस्फुर्तीने उतरल्या आहेत. तालुक्यातील मुळेखंड, कोप्रोली, भेंडखळ या ग्रामपंचायतींनी तर गावबंदी करीत गावाच्या सीमा, रस्तेही सील केल्या आहेत. गावाच्या प्रवेशद्वारावरच ड्रम, पाईप, बांबूच्या काठ्या टाकून बाहेरुन येणार्या अगंतुक पै-पाहूणे आणि अनोळखी इसमांना गावबंदी केली आहे. तशा आशयाचे प्रवेशद्वारावरच जाहीर गावबंदीचे फलकही लावण्यात आले आहेत. तर जगप्रसिद्ध घारापुरी बेटावरही लॉक डाऊनमुळे दळणवळण व्यवस्था ठप्प झाली आहे. दळणवळणा अभावी बेटावरील नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंची मोठ्या प्रमाणावर उणीव भासत आहे. त्यामुळे घारापुरी बेटावरील ग्रामस्थांवर उपासमारीचे संकट उभे ठाकले आहे. घारापुरी ग्रामस्थांसाठी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी उपाययोजना करण्यात यावी अशी लेखी विनंती ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच बळीराम ठाकूर यांनी उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांच्याकडे केली आहे.