Breaking News

रायगड जिल्ह्यात पाहणी दौरा

चक्रीवादळात झालेल्या नुकसान व कार्यवाहीचा केंद्रीय पथकाकडून आढावा

अलिबाग : प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळात झालेल्या नुकसानीचा गुरुवारी (दि. 10) केंद्र सरकारच्या पथकाने पाहणी करून आढावा घेतला. पाहणी दौर्‍यानंतर अलिबाग सोगाव येथील आऊट पोस्ट हॉटेल येथे आयोजित बैठकीत जिल्हा प्रशासनाकडून केलेल्या कार्यवाहीबाबत संगणकीय सादरीकरणाद्वारे केंद्रीय पथकाला माहिती देण्यात आली.
रायगड व रत्नागिरी जिल्ह्यांत 3 जून रोजी निसर्ग चक्रीवादळ घोंघावले. त्याचा मोठा फटका रायगड जिल्ह्याला बसून नागरिकांच्या मालमत्तेचे व फळबागांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी तसेच प्रशासनाकडून करण्यात आलेल्या कार्यवाहीचा आढावा घेण्यासाठी केंद्र शासनाचे आंतरमंत्रालयीन पथक गुरुवारी आले होते. प्रशासन व सीबीटी सहसचिव रमेशकुमार गंटा, अर्थ मंत्रालय (खर्च) सल्लागार आर. बी. कौल, उर्जा मंत्रालय संचालक एन. आर. एल. के. प्रसाद, ग्रामीण विकास उपसचिव एस. एस. मोदी, कृषी मंत्रालय संचालक आर. पी. सिंग, रस्ते वाहतूक व महामार्ग क्षेत्रीय कार्यकारी अभियंता मुंबई तुषार व्यास यांचा या पथकामध्ये समवेश होता.
दौर्‍याच्या प्रांरभी या पथकाने अलिबाग तालुक्यातील रेवदंडा व वरसोली या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करून तेथील नुकसानग्रस्त नागरिकांशी संवाद साधला आणि प्रशासनाकडून देण्यात आलेल्या मदतीबाबतची माहिती जाणून घेतली.
पाहणी दौर्‍यानंतर अलिबाग सोगाव येथील आऊट पोस्ट हॉटेल येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी आणि रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे दोन्ही जिल्ह्यांत प्रशासनाकडून केलेल्या कार्यवाहीबाबतची माहिती केंद्रीय पथकाला दिली.
चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईपासून कोणीही वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यात यावी, अशी सूचना केंद्रीय पथकातील सदस्यांनी जिल्हाधिकार्‍यांना केली. कृषी, मत्स्य, महसूल, महावितरण या संबंधित सर्व विभागांच्या क्षेत्रीय स्तरावरील अधिकार्‍यांनी जनतेच्या झालेल्या नुकसानीची तत्परतेने नोंद घेऊन त्या त्या विभागांनी आपली जी काही कामे असतील ती पूर्ण करून घ्यावीत, असेही त्यांनी सांगितले.
निसर्ग चक्रीवादळाच्या या आपत्तीमध्ये जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या खबरदारीमुळे अत्यंत कमी जीवितहानी झाली. संपर्क यंत्रणा अत्यंत कमी वेळात सुरू करण्यात यश मिळविले तसेच वाहतुकीसाठी रस्ते अत्यंत कमी वेळात खुले करण्यात आले. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू करण्यात आले. गरजूंना अन्नधान्याचा पुरवठा करण्यात आला. त्याबद्दल जिल्हा प्रशासनाचे पथकाकडून अभिनंदन करण्यात आले.
या वेळी रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पांडुरंग शेळके, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अलिबाग विभागीय कार्यकारी अभियंता आर. एस. मोरे, विद्युत महावितरण कार्यकारी अभियंता श्री. पाटील, उपविभागीय अधिकारी शारदा पोवार, तहसीलदार सचिन शेजाळ, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक, तहसीलदार विशाल दौंडकर, तसेच रायगड व रत्नागिरी जिल्ह्यांतील विविध शासकीय विभागांचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply