सेवानिवृत्तीनिमित्त नागरी गौरव; सर्वपक्षीयांची उपस्थिती
उरण : रामप्रहर वृत्त
समाजाचे काम करण्यासाठी कधीही मागे न हटणार नाही याची खात्री असलेले नेते म्हणजे कॉम्रेड भूषण पाटील. त्यांची आणि माजी मैत्री ही कोणत्याही पक्षावर अवलंबून नव्हती, कारण ते सर्वांसाठी तळमळीने काम करतात. लोकांच्या सेवेसाठी काम करणारे नेते म्हणून ते कायम राहणार आहेत, असे गौरवोद्गार माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी त्यांच्या नागरी गौरव सोहळ्यात काढले.
कामगार नेते आणि जेएनपीटीचे माजी विश्वस्त कॉ. भूषण पाटील यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त गुरुवारी (दि. 31) जेएनपीटी टाऊनशीप येथील मल्टीपर्पज हॉलमध्ये भव्य नागरी गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर बोलत होते. त्यांनी कॉ. पाटील यांच्या कार्याचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
माजी आयआरएस अधिकारी सुधाकर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला माजी आमदार जयंत पाटील, मनोहर भोईर, भाजपचे ज्येष्ठ नेते जे.एम. म्हात्रे, काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस भावना घाणेकर, जेएनपीटीचे विश्वस्त दिनेश पाटील, रवि पाटील, कम्युनिस्ट पक्षाचे नेते डॉ. डी.एल. कराड, कॉ. टी. नरेंद्र राव, सीमा घरत आदी उपस्थित होते.
या वेळी कॉ. भूषण पाटील यांच्या कार्यावर आधारित कामगार, कष्टकरी, प्रकल्पग्रस्त, दिनदुबळ्यांचा विश्वस्त या गौरव ग्रंथाचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्याचप्रमाणे गौरव समितीच्या वतीने त्यांना सन्मानित करण्यात आले. कामगार नेते संतोष पवार यांनी सन्मानपत्राचे वाचन केले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रफुल्ल वशेणीकर यांनी केले.
RamPrahar – The Panvel Daily Paper