खारघर : प्रतिनिधी
पनवेल परिसरात दोन दिवसांपूर्वी रुग्णालयांना सुरळीत ऑक्सिजन पुरवठा होत नसल्याने पनवेलचे प्रांत अधिकारी दत्तात्रेय नवले यांनी शुक्रवारी ऑक्सिजन निर्मिती करणार्या तळोजा एमआयडीसीमधील लिंडे ऑक्सिजन निर्मिती कंपनीला भेट देत ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना कंपनीला दिल्या. राज्य शासनाने ऑक्सिजन निर्मिती करणार्या कंपन्यांना 80 टक्के ऑक्सिजन मेडिकल वापरासाठी व उर्वरित 20 टक्के ऑक्सिजन आद्योगिक वापरासाठी देण्याच्या सूचना केल्या आहेत. अशा परिस्थितीत पनवेल मधील रुग्णालयांना ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होत नसल्याच्या तक्रारी प्रांत अधिकारी दत्तात्रेय नवले व पालिकेचे उपायुक्त संजय शिंदे यांना प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर या अधिकार्यांनी थेट ऑक्सिजन निर्मिती करणार्या लिंडे या कंपनीला भेट देत संबंधित कंपनी प्रशासनाला रुग्णालयाला सुरळीत ऑक्सिजन पुरवठा करण्याच्या सूचना दिल्या. या भेटीनंतर पनवेल परिसरातील रुग्णालयांना ऑक्सिजनचा पुरवठा सुरु झाला आहे. रायगड जिल्ह्यात लिंडे आणि जेएसडब्लू या कंपनीमार्फत ऑक्सिजन निर्मिती केली जाते. राज्यभरात या कृत्रिम ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे.