Breaking News

सुकापूरमध्ये 51 इमारती धोकादायक

ग्रामपंचायतीने बजावल्या नोटिसा

पनवेल : वार्ताहर

सुकापूर (पाली देवद) ग्रामपंचायतीने धोकादायक ठरवलेल्या तब्बल 51 इमारतींमध्ये नागरिकांचे वास्तव्य गेल्या काही वर्षांपासून आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी घडलेल्या महाड येथील दुर्घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या धोकादायक इमारतींची यादी बनवण्यात आली आहे. त्या खाली करण्याच्या नोटिसा ग्रामपंचायतीने बजावल्या आहेत.

तसेच सिडको नैना प्राधिकरणाकडेही ग्रामपंचायतीने पाठपुरावा केलेला आहे. मात्र, ऑगस्ट, 2019 मध्ये सिडको महामंडळामध्ये खासगी इमारतीचे स्ट्रक्चरल लेखापरीक्षण करण्याचा कोणताही विभाग उपलब्ध नसल्याचे ग्रामपंचायतीला कळविण्यात आलेले आहे. त्यामुळे एकीकडे शहराचे नियोजन करायचे आणि दुसरीकडे खासगी इमारतीचे स्ट्रक्चरल लेखापरीक्षण करण्याचा विभाग नसल्याचे कळविणे याबाबत नागरिकाकडून सिडकोच्या कारभारा विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

सुकापूर येथील अनेक इमारतीना तडे गेलेले आहेत, तर काही मोडकळीस आलेल्या आहेत. धोकादायक इमारतींच्या लगत इमारती, तसेच रहदारीचा रस्ता आहे. 51 धोकादायक इमारतीपैकी जवळपास 40 हून अधिक इमारतींमध्ये नागरिक वास्तव्य करत आहेत. नैनाचे भिजत घोंगडे असल्याने इमारत बांधण्यासाठी परवानगी मिळत नसल्याचे बांधकाम व्यावसायिकांचे म्हणणे आहे. अशा प्रकारे अत्यंत नादुरुस्त झालेल्या इमारती कोणत्याही क्षणी पडून अपघात होण्याची शक्यता आहे.

पर्यायी व्यवस्था नसल्याने नागरिकांना आपला जीव धोक्यात घालून त्या धोकादायक इमारतीत वास्तव्य करावे लागत आहे. एफएसआय मिळत नाही, तसेच अन्य बांधकाम व्यावसायिकांनाही रिडेव्हलपमेंटसाठी परवानगी मिळत नसल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply