Breaking News

कर्जतच्या धाबेवाडीमधील आदिवासी महिलांचा

अशुद्ध पाण्यासाठी विहिरीवर रात्रीचा मुक्काम

कर्जत : बातमीदार

तालुक्यातील खांडस ग्रामपंचायत हद्दीमधील धाबेवाडीमध्ये आदिवासी ग्रामस्थांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. विहिरींनी तळ गाठल्याने दगडातून झिरपणारे पाणी साठवून ते आपल्या हंड्यात पडावे, यासाठी या आदिवासी महिला रात्र विहिरीवर काढतात. तर शेजारी असलेल्या बांगरवाडीमधील महिला घुटेवाडीत असलेल्या बंधार्‍यामधील विहीरीवर  जाऊन गढूळ पाणी घरी घेऊन येत आहेत. धाबेवाडी ही 40 घरांची वस्ती असलेली आदिवासीवाडी  असून, या वाडीत दरवर्षी उन्हाळ्यात पाणीचे दुर्भिक्ष जाणवते. या वाडीपासून दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या घुटेवाडी येथे एक मातीचा बंधारा असून, दगड मातीने भरलेल्या या बंधार्‍याच्या मध्यभागी असलेल्या विहिरीमधील पाणी घुटेवाडी ग्रामस्थ नेत असतात. या विहिरीतील पाण्यानेदेखील तळ गाठला आहे. त्यामुळे  बंधार्‍यात वेगवेगळ्या ठिकाणी डवरे खोदून त्यात साठणारे पाणी स्थानिक लोक हंड्यात भरून नेत असतात, तर घुटेवाडी येथील महिला तेथून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या गावंडवाडी येथील बंधार्‍यावर जाऊन पाणी आणतात. पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी धाबेवाडीमधील महिला रात्री विहिरीवरच मुक्काम करतात. विहिरीवर तासन्तास थांबल्यानंतर या महिलांना दिवसाआड चार हांडे पाणी मिळते. त्यासाठी 10 घरांतील महिला रात्रीचे जेवण उरकून 9 वाजता विहीर गाठतात आणि तेथे काळोखात बसून झर्‍यामधील पाणी विहिरीत साठल्यानंतर ते घरी घेऊन जातात. या भागातील  धाबेवाडीबरोबरच परिसरातील    बांगरवाडी, पेटारवाडी, चाफेवाडी, वडाचीवाडी, मेंगाळवाडी, पादिरवाडी आणि जांभूळवाडीमध्ये ही स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. या सर्व आदिवासी वाड्या पाणीपुरवठा कृती आराखड्यात समाविष्ट आहेत. त्यांना ट्रँकरने पाणीपुरवठा करावा, या मागणीचा प्रस्ताव खांडस ग्रामपंचायतीने दिला आहे, मात्र गेल्या महिन्यापासून या सर्व आदिवासी वाड्या ट्रँकरच्या प्रतीक्षेत आहेत.

ग्रामस्थांची मागणी येताच ग्रामपंचायतीने कर्जत पंचायत समितीकडे टँकरची मागणी केली आहे. पुढील चार वर्षाच्या काळात खांडस ग्रामपंचायतीमधील सर्व आदिवासी वाड्यांमधील महिलांना विहिरीवर पाण्यासाठी रात्र जागून काढावी लागणार नाही, असे नियोजनबद्ध काम करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

-मंगल ऐनकर, सरपंच,खांडस ग्रामपंचायत, ता. कर्जत

या आदिवासी वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करण्याबाबतचे प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे पाठवले आहेत. तेथून आदेश आल्यानंतर तत्काळ टँकर सुरू केले जातील.

-अविनाश कोष्टी, तहसीलदार, कर्जत

Check Also

आदिवासी समाजाच्या विविध समस्यांवर आमदार महेश बालदी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

पनवेल : रामप्रहर वृत्तआदिवासी समाजाच्या विविध समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी आमदार महेश बालदी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी …

Leave a Reply