पनवेल : बातमीदार – अधूनमधून येणार्या पावसाचा फटका कृषीमालाला मोठ्या प्रमाणात बसतो. यावेळीही अशी परिस्थिती आहे. डाळींब आणि सीताफळाचा हंगाम तेजीत असताना या फळांना पावसाचा फटका बसला आहे. तयार झालेल्या फळाला पाऊस लागल्याने डाळिंबावर काळे डाग पडून फळ खराब होऊ लागले आहे. सीताफळेही गळून पडू लागली आहेत. त्यामुळे बाजारात येणारी आवक कमी झाली असून दर वाढले आहेत.
डाळींब वर्षभर मिळत असले, तरी पावसाळ्यात त्यांचे उत्पादन अधिक चांगले असते. रोपांना चांगले पाणी मिळत असल्याने अगदी रसदार आणि टपोर्या दाण्यांची डाळिंबे या काळात पाहायला आणि खायला मिळतात. या काळात त्यांचे दरही कमी असतात. मात्र आता सलग पडणार्या पावसाने मध्येच विश्रांती घेत पुन्हा हजेरी लावायला सुरुवात केली. त्यामुळे शेतात तयार झालेला डाळिंबावर पाणी पडून त्यावर काळे डाग पडायला सुरुवात झाली आहे. यामुळे फळ खराब होत आहे. डाग लागलेल्या फळे खरेदी करण्यास कुणी तयार होत नाही. आता बाजारात डाळिंबाची आवक कमी झाली आहे.
घाऊक बाजारात जेजुरी, नगर, सांगोला, सासवड येथून डाळिंबाची आवक होत असते. आता सासवडवरून आवक सुरू आहे. ही आवक मागच्या महिन्यापेक्षा कमी आहे. त्यामुळे बाजारात सध्या डाळिंबाचे दर वाढले आहेत. 50 ते 100 रुपये किलो असणारे डाळिंबाचे दर घाऊक बाजारातच 50 ते 150 रुपये किलो झाले आहेत.
हीच परिस्थिती सीताफळाच्या बाबतीतही आहे. घाऊक बाजारात सध्या सासवड, शिरूरमधून सीताफळांची आवक होत आहे. त्यांनाही पावसाचा फटका बसला आहे. त्यामुळे त्यांचे दर वाढले आहेत. आकारानुसार सीताफळ 40 ते 100 रुपये किलो घाऊक बाजारात आहेत. त्यातही आकाराने मोठे असलेल्या गोल्डन सीताफळाची आवक अजून सुरू झालेली नाही. त्यामुळे सीताफळाचा हा हंगाम मंदीतच असल्याचे व्यापारी सांगत आहेत.
व्यापारी चिंताग्रस्त
आधीच बाजारात खरेदीदार कमी आहेत आता आवकही कमी होत आहे. आधीच कमी असणार्या ग्राहकांची मागणी पूर्ण करता येईल इतका मलाही बाजारात येत नसल्याने व्यापारी चिंताग्रस्त आहेत. यावर्षी चांगली फळे लागली असून चांगला माल बाजारात पाठवता येईल, असे निरोप अनेक शेतकर्यांनी व्यापार्यांना पाठवले होते, मात्र मध्येच आलेल्या या पावसाने शेतकर्यांच्या आशेवर पाणी पडले आहे. त्यामुळे बाजारात मंदीचे सावट कायम असल्याचे व्यापारी दिलीप खोत यांनी सांगितले.