Breaking News

‘रोटरी’ने राबविले विविध सामाजिक उपक्रम

पनवेल : वार्ताहर – रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाउन गेले 30 हून अधिक वर्षे अव्याहतपणे आपले सामाजिक कार्य नित्यनेमाने करत आहे. पर्यावरण संरक्षणापासून समुदाय व आर्थिक विकासापर्यंत, जलसंधारण व स्वच्छतेपासून मूलभूत शिक्षण व साक्षरते पर्यंत,  रोग प्रतिबंध व उपचारांपासून माता व बाल आरोग्यपर्यंत, समाज उन्नतीकरिता सर्वच क्षेत्रात रोटरी क्लबचे भरीव योगदान आजतागायत राहिले आहे.

सद्य परिस्थितीतील अनेक अडथळे व मर्यादा पार करत या रोटरी कालबने सामाजिक बांधिलकी न विसरता आपला सामाजिक कार्याचा नंदादीप अखंड तेवत ठेवला आहे. कोविड-19 चे वैश्विक संकट, निसर्ग चक्रीवादळाची नैसर्गिक आपत्ती व त्यामुळे रायगड जिल्ह्याचे झालेले अतोनात नुकसान, या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत क्लबने ने गेल्या दोन महिन्यात तब्बल 17 सामाजिक उपक्रम राबविले आहेत. यात पर्यावरण संरक्षण अंतर्गत एक, समुदाय व आर्थिक विकास अंतर्गत आठ, जलसंधारण व स्वच्छता अंतर्गत एक, मूलभूत शिक्षण व साक्षरता अंतर्गत तीन, रोग प्रतिबंध व उपचार अंतर्गत चार उपक्रमांचा समावेश आहे.

पर्यावरण संरक्षण अंतर्गत गाढेश्वर धरण नजीकच्या वनसंरक्षण खात्याने प्रदान केलेल्या साडेबारा एकर जमिनीवर रोटरी फॉरेस्ट निर्माण करण्याच्या अतिशय महत्त्वाकांक्षी उपक्रमाची मुहूर्तमेढ याच काळात रोवली गेली. गेल्या दोन महिन्यात या ठिकाणी 325 हून अधिक प्रौढ वृक्षांची लागवड करण्यात आलेली आहे. मूलभूत शिक्षण व साक्षरता अंतर्गत ऑनलाइन झूम मिटिंगच्या माध्यमाने, मुलांची मानसिकता ओळखून शिक्षणाला अधिकाधिक मनोरंजक कसे बनवावे या विषयावर शिक्षकांसाठी ट्रेनिंग आयोजित केले गेले, तसेच या बदलत्या युगात शिक्षकांना डिजिटल माध्यमांची ओळख व प्रशिक्षण मिळवून देणारा डिजिटल गुरुमंत्र या उपयोगी अश्या उपक्रमात रोटरीने सहभागी झाले.

डिजिटल गुरुमंत्र या प्रशिक्षण उपक्रमात राज्यभरातून तब्बल 36000 शिक्षक सहभागी झाले. समुदाय व आर्थिक विकास अंतर्गत प्रोजेक्ट पंचम तसेच ऑनलाइन मीटिंगच्या माध्यमातून मानसिक व भावनिक व्यवस्थापनाच्या कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या. रोगप्रतिबंध व उपचार अंतर्गत सद्य परिस्थितीतील प्लाझ्मा थेरपीचे महत्व लक्षात घेऊन रक्तदान शिबिर आयोजित केले गेले. तसेच एन्फ्लूएन्झा आजार विरोधात रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यासाठी पनवेलकरांकरिता एन्फ्लूंझा लसीकरणाचा स्तुत्य उपक्रम देखील राबविला गेला.

तरुणांमध्ये अँटी टोबॅको जनजागृती करिता ऑनलाइन झूम मीटिंग माध्यमातून कार्यशाळा आयोजित करण्यात आली, तसेच केईएम रुग्णालयातील कोविड योद्ध्यांकरिता 660 मास्क्स व 1000 प्रोटीन बार्स चे वाटप देखील केले. 15 ऑगस्टच्या निमित्ताने वॉर हिरो या संकल्पनेवर आधारित भारताचा स्वातंत्र्यदिन अतिशय अभिनव पद्धतीने साजरा केला. या कार्यक्रमात कॅप्टन जोशी तसेच कमांडर जांभेकर यांनी त्यांचे युद्धाचे अनुभव व्यक्त केले. या कार्यक्रमात निवृत्त सैनिकांचा सत्कार करण्यात आला, तसेच व्यावसायिक उत्कृष्टते करिता दोघांना वोकेशनल अवॉर्ड देण्यात आले. आणि कोविड-19 लॉकडाउनच्या दिवसांमध्ये उत्तम समाज सेवा केल्याबद्दल तिघांना सोशल सर्विस अवॉर्ड देखील देण्यात आले.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply