संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची ग्वाही
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत लडाखच्या मुद्यावरून भारत-चीन सीमावादावर अधिकृतपणे भारताची भूमिका मांडली. सरकारच्या वेगवेगळ्या गुप्त यंत्रणांदरम्यान समन्व आणि वेळ परीक्षण तंत्र आहे, ज्यामध्ये केंद्रीय पोलीस दल आणि तिन्ही सशस्र दलांच्या गुप्त यंत्रणांचाही समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच लडाख दौरा करून भारतीय जवानांची भेट घेतली आणि समस्त देशवासी आपल्या वीर जवानांसोबत उभे आहेत, हा संदेशही त्यांना दिला, असे राजनाथ सिंह यांनी या वेळी म्हटले.
मीदेखील लडाखला जाऊन आपल्या शूरवीरांसोबत काही वेळ व्यतीत केला. मलाही त्यांचे अदम्य साहस, शौर्य आणि पराक्रम जाणवला, हे मी तुम्हाला सांगू इच्छितो. एप्रिल महिन्यापासून पूर्व लडाखच्या सीमेवर चीनकडून सेनेची संख्या तसेच युद्ध सामग्रीच्या संख्येत वाढ दिसून आली. 15 जून रोजी चीनविरुद्ध गलवानमध्ये रक्तरंजित संघर्षात आपल्या जवानांनी बलिदान दिले आणि चिनी सैन्याचेही मोठे नुकसान झाले. 29-30 ऑगस्ट रोजी पॅन्गाँग सरोवरच्या दक्षिण भागात यथास्थिती बदलण्याचा प्रयत्न करण्यात आला. भारतीय सेनेने त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला. द्विपक्षीय संबंधाचा चीनकडून अनादर झाल्याचे यातून स्पष्टपणे दिसते. वास्तविक नियंत्रण रेषेचा 1993-1996च्या करारात स्वीकार करण्यात आलाय, परंतु चीनकडून हा करार मोडण्यात आला. त्यांनी केलेल्या कारवाईमुळेच सीमेवर संघर्ष घडून आला. भारतीय जवानांनी जिथे संयमाची गरज होती तिथे संयम राखून तर जिथे शौर्याची गरज होती तिथं शौर्याचं उदाहरण दिले, असे राजनाथ सिंह यांनी आपल्या भाषणादरम्यान म्हटले.
परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनीही चिनी परराष्ट्रमंत्र्यांना कराराचे पालन केले तर शांती कायम राखली जाऊ शकते, हे सांगितले. कोणत्याही प्रकारच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी आम्ही तयार आहोत. आपल्या जवानांचा जोश आणि धैर्य मजबूत आहे. लडाखमध्ये आपण एका आव्हानात्मक परिस्थितीला तोंड देत आहोत आणि आपल्याला हा प्रस्ताव पारित करायला हवा की संपूर्ण सदन जवानांसोबत उभे आहे, असेही राजनाथ सिंह यांनी म्हटले.