सोलापूर ः प्रतिनिधी : प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता व उन्हाळी सुट्यांच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने मुंबई, पुण्याहून गोरखपूर व मंडुआडीहपर्यंत साप्ताहिक विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. 7 एप्रिलपासून या गाड्या सोडण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या सोलापूर मंडलाने दिली आहे.
पुणे ते गोरखपूरदरम्यान 7 एप्रिल ते 30 जून या कालावधीत दर रविवारी विशेष गाडी सोडली जाईल. ही गाडी सायंकाळी 7.55 वाजता पुणे स्थानकातून सुटून तिसर्या दिवशी पहाटे 4.30 वाजता गोरखपूरमध्ये पोहचेल, तर प्रत्येक मंगळवारी सकाळी 7.25 वाजता गोरखपूर येथून सुटून दुसर्या दिवशी सायंकाळी पाच वाजता पुण्यात दाखल होईल. या गाडीच्या दोन्ही बाजूने एकूण 26 फेर्या होतील. या गाडीला 12 स्लीपर क्लास, 3 जनरल, 2 ब्रेकयान असे एकूण 17 डबे असणार आहेत. ही गाडी पुणे-दौंड-अहमदनगर-बेलापूर-कोपरगाव-मनमाड-भुसावळ-खंडवा-इटारसी-भोपाळ-बीना-झाशी-ओराई-कानपूर-बाराबंकी-गोंडा-बस्ती-गोरखपूर अशी धावणार आहे.
पुणे ते मंडुआडीह ही विशेष गाडी 11 एप्रिल ते 27 जूनदरम्यान प्रत्येक गुरुवारी पुण्यातून सकाळी 9.30 वाजता सुटेल, तर तिसर्या दिवशी पहाटे 3.25 वाजता मंडुआडीह येथे पोहचेल. तेथून प्रत्येक शनिवारी पहाटे 4.45 वाजता सुटून दुसर्या दिवशी दुपारी 12 वाजता पुणे स्थानकात येईल. या गाडीला 12 स्लीपर, 3 जनरल, 2 ब्रेकयान असे 17 डबे असणार आहेत़ ही गाडी पुणे-दौंड-अहमदनगर-बेलापूर-कोपरगाव-मनमाड- भुसावळ-खंडवा-इटारसी-जबलपूर-कटनी- सतना-माणिकपूर-इलाहाबाद-ज्ञानपूर-मंडूआडीह अशी धावणार आहे़.
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 12 एप्रिल ते 5 जुलैदरम्यान प्रत्येक सोमवारी पहाटे 5.10 वाजता गोरखपूरसाठी विशेष गाडी सोडली जाईल. ही गाडी दुसर्या दिवशी दुपारी 12.10 वाजता गोरखपूर स्थानकात पोहचेल, तर प्रत्येक शनिवारी गोरखपूर येथून दुपारी 2.40 वा. निघून दुसर्या दिवशी 8.25 वाजता पुण्यात पोहचेल.
मुंबई-मंडुआडीह गाडी 17 एप्रिल ते 3 जुलैदरम्यान धावेल. ही गाडी दुपारी 12.45 वाजता निघून दुसर्या दिवशी पहाटे 4.45 वाजता मंडुआडीह स्थानकात दाखल होईल. तिथून सकाळी 6.30 वाजता निघून दुसर्या दिवशी 7.30 वाजता मुंबईत पोहचेल.