Breaking News

कार्यकर्त्यांनो, गाफील राहू नका, जागते रहो

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचे खडे बोल; कोपरखैरणे येथे शिवसेना-भाजप मेळावा

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त : गणेश नाईक यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास दिलेला नकार आणि भाजपशी झालेल्या युतीमुळे ठाणे लोकसभा मतदारसंघात आतापासूनच विजय निश्चित असल्याचे मानणार्‍या शिवसेनेच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांना पक्षाचे नेते व ठाणे जिल्हाप्रमुख एकनाथ शिंदे यांनीच खडे बोल सुनावले आहेत. कोपरखैरणे येथे झालेल्या शिवसेना-भाजप युतीच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना शिंदे यांनी आनंद परांजपे यांना सहज घेऊन आपला विजय नक्की होईल असे गृहीत धरू नका. गाफील राहून चालणार नाही, असा सल्ला दिला.कोपरखैरणे येथील ज्ञानविकास हायस्कूल मैदानावर झालेल्या युतीच्या मेळाव्यात दोन्ही पक्षांचे ठाणे तसेच नवी मुंबईतील प्रमुख नेते उपस्थित होते.शिवसेना-भाजप युती झाल्यापासून व राष्ट्रवादी काँग्रेसने आनंद परांजपे यांना ठाणे मतदारसंघातून उमेदवारी दिल्यापासून शिवसेनेच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या नेतेमंडळींनी घेतलेल्या बैठकीत यंदाच्या निवडणुकीमध्ये युतीचे उमेदवार राजन विचारे चार लाखांहून अधिक आघाडी घेऊन विजयी होतील, अशी गर्जना केली होती, मात्र एकनाथ शिंदे यांनी रविवारी झालेल्या युतीच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांना गाफील राहू नका, असा सल्ला देत ही लढाई एकतर्फी होणार नसल्याचे संकेत दिले.मेळाव्यातील सर्वच नेतेमंडळींनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गणेश नाईक यांच्यावर निशाणा साधला. गणेश नाईक यांचे नवी मुंबईवरील वर्चस्व दूर झाल्यामुळेच त्यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली, असाच सूर सार्‍यांनी आळवला. आमदार मंदा म्हात्रे, शिवसेना उपनेते विजय नाहटा, भाजपचे नेते व राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार रमेश पाटील यांच्या भाषणांत गणेश नाईक यांची माघार आणि आनंद परांजपे यांना ‘बळीचा बकरा’ बनवल्याचा उल्लेख वारंवार झाला. ठाणे लोकसभा मतदारसंघातील युतीचे उमेदवार राजन विचारे यांनीही नवी मुंबई महापालिकेतील सत्ताधारी पक्षाने विविध कामांसाठी देऊ केलेला खासदार निधी नाकारल्याचा आरोप केला.आता मंत्री आपले आहेत. सत्ता आपली आहे. तरीही मेहनत करावीच लागेल. शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहचवल्या पाहिजेत. मतदार यादी नीट तपासून जास्तीत जास्त लोकांना मतदानासाठी उतरवून आपले मतदान कसे वाढेल याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

-एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाममंत्री

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply