अलिबाग : प्रतिनिधी
अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रसूती कक्षात खाटा कमी पडत आहेत. तेथे फरशिवर गादी टाकून प्रसूतीसाठी येणार्या मातांवर उपचार केले जात आहेत. प्रसूती कक्षदेखील अपुरा पडत आहे. त्यामुळे प्रसूतीसाठी येणार्या मातांची गैरसोय होत आहे. प्रसूती कक्षात खाटा वढवाव्यात, अशी मागणी केली जात आहे.
अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात रायगड जिल्ह्यातून गरोदर माता प्रसूतीसाठी येत असतात. या रुग्णालयातील प्रसूती आणि नवजात मुलांच्या कक्षात 42 खाटा आहेत. दररोज 20 ते 22 नवीन गरोदर माता या कक्षात दाखल होतात. त्यामुळे येथील खाटा कमी पडतात. परिणामी गरोदर मातांना खाली गादी टाकून त्यावर झोपवले जात आहे.
रोज वाढत असलेली गरोदर मातांची संख्या पाहता हा प्रसूती कक्ष अपुरा पडत आहे. हा प्रसूती कक्ष वाढवून त्यातील खाटांची संख्या वाढविणे अंत्यत गरजेचे आहे.
प्रसूती कक्षात गरोदर मातांची संख्या वाढली आहे. मात्र त्यांची गैरसोय होणार नाही, याची खबरदारी घेतली जात आहे. लवकरच ही समस्या सोडविली जाईल.
-डॉ. सुहास माने, जिल्हा शल्यचिकित्सक, अलिबाग