मानवाधिकार उल्लंघनप्रकरणी आयोगाकडे तक्रार
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
कंगना रानौत प्रकरण व माजी नौदल अधिकार्याला मारहाण केल्याप्रकरणी भाजपने राज्य सरकारविरोधात एल्गार पुकारला आहे. याबाबत भाजप शिष्टमंडळाने महाराष्ट्रातील ठाकरे सरकारविरोधात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे धाव घेतली आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात मानवाधिकाराचे उल्लंघन होत असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांच्या नेतृत्वात राज्यसभा सदस्यांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष न्या. एच. एल. दत्तू यांच्याकडे याबाबतची तक्रार केली आहे. या तक्रारीत भाजप खासदारांनी राज्यातील आठ घटनांचा हवाला देत ठाकरे सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.
राज्यसभेचे सदस्य विनय सहस्त्रबुद्धे यांच्या नेतृत्वात राज्यसभेचे खासदार भागवत कराड व डॉ. विकास महात्मे यांनी आयोगाला सांगितले की, डिसेंबर 2019पासून राज्यात मानवाधिकार उल्लंघनाच्या घटनांत वाढ झाली. सोशल मीडियावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात लिहिणार्यांवर अत्याचार केले जात आहेत. 23 डिसेंबर 2019 रोजी सोशल मीडियावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात हिरामन तिवारी नावाच्या व्यक्तीने भाष्य केले, तर सत्ताधारी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी या व्यक्तीवर हल्ला करून जबरदस्तीने त्याचे मुंडन करण्यात आले. 26 ऑगस्टला महाविद्यालयाकडून फी वाढवल्यामुळे त्याचा विरोध करणार्यांना मारहाण, पालघरमध्ये 16 एप्रिल रोजी झालेले साधू प्रकरण, पत्रकारांना ताब्यात घेणे अशा घटनांचा उल्लेख भाजप खासदारांनी या वेळी केला. उद्धव ठाकरे सरकारमध्ये मानवाधिकारांचे उल्लंघन होत असल्याचे भाजपच्या शिष्टमंडळाने म्हटले आहे. अशा परिस्थितीत सर्व मानवी प्रकरणांची दखल घेत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली आहे.
सुशांतच्या शवाचे दर्शन घेण्यासाठी 14 जूनला रिया चक्रवर्ती रुग्णालयातील शवागृहात गेली होती. त्याबाबतचे वृत्त विविध वृत्तपत्र व वाहिन्यांवरून प्रसारित झाले. त्यावरून आयोगाने मुंबई पोलीस व रुग्णालयाच्या प्रशासनाला ’सुमोटो’ नोटीस बजावली होती, मात्र दोन्ही यंत्रणानी तिला प्रवेश दिल्याबाबतचे वृत्त फेटाळून लावत त्याबाबत प्रतिज्ञपत्रक सादर केले. आयोगाने ते मान्य करीत त्यांना क्लीन चिट दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात कार्टून फॉरवर्ड केल्याने कांदिवलीतील एका माजी नौदल अधिकार्याला मारहाण केल्याची घटनाही घडली होती. मदन शर्मा असे या अधिकार्याचे नाव होते. शर्मा यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार त्यांना आठ ते 10 जणांनी बेदम मारहाण केली. ही घटना सोसायटीच्या सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाली होती. त्यानंतर या आरोपींना पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना जामीन मिळाला होता. या घटनेवरूनही भाजपने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.