पेण ः प्रतिनिधी
पेण तालुका म्हणजे गणपतीचे माहेरघर. येथे सुंदर गणेशमूर्ती बनविण्याचे काम वर्षभर गणेश केंद्रांत चालते. त्यासाठी हजारो हात दिवसभर राबतात, परंतु यंदा कोरोनामुळे लॉकडाऊनमध्ये बंद पडलेले कारखाने व नंतर निसर्ग चक्रीवादळामुळे गणपती कारखानदार अगदी मेटाकुटीला आलेत. त्यातच प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींना केलेल्या बंदीमुळे कारागिरांवर बेरोजगारीची टांगती तलवार आहे. परिणामी गणपती कारखानदारांचा शाडूच्या मूर्ती बनविण्याकडे कल वाढत आहे. गणेशमूर्ती कारागीर काम नसल्याने उदरनिर्वाहाच्या चिंतेत आहेत. यावर मात करण्यासाठी कारागीर पुन्हा सज्ज झाले आहेत. पेण येथील कारखान्यात अनेक वर्षे काम करणारे प्रकाश बावकर यांनी काम नसल्याने खचून न जाता आपल्या घरात शाडूच्या मातीचे गणपती तयार करण्यास सुरुवात केली आहे. पुढील वर्षी मातीच्या गणपतीला मागणी असल्याने शाडू मातीचे गणपती बनविण्यात येत आहेत. लॉकडाऊन व प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींच्या बंदीमुळे मातीच्या गणपतीची मागणी वाढत आहे. बावकर यांनी आपल्या घरातील कारखान्यात शंभरवर शाडू मातीच्या गणेशमूर्ती तयार केल्या आहेत.