पनवेल : रामप्रहर वृत्त
भाजप नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांनी कार्यकारी अभियंता पाणी पुरवठा सिडको यांच्याकडे प्रभागातील अपुर्या प्रमाणात होणार्या पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे.
नगरसेविका पाटील यांनी दिलेल्या निवेदनामध्ये म्हटल्याप्रमाणे, खारघर मधील प्रभाग क्र. 4 मधील से 19,20,21 व 11,13 येथील बहुतांश सोसायटीमध्ये मागील एक महिन्यापासून पाणी पुरवठा हा एकतर कमी दाबाने किंवा मागणी पेक्षा कमी होताना दिसून येत आहे. सध्यस्थितीत पावसाळा सुरू आहे व तोही मोठया प्रमाणात असतांना पाण्याचा तुटवडा कसा?, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.
सोसायटीतील पदाधिकारी पाण्यासंदर्भात नगरसेविका पाटील यांच्याकडे अडचणी मांडत असतात. या बाबतीत सहाय्यक अभियंता पाणीपुरवठा विभाग, खारघर यांना फोन केला की ते किंवा त्यांच्या कार्यालयातील प्रतिनिधी येतात व सोसायटीत आल्यानंतर पाण्याचे मीटर चेक करतात, अथवा पाणी पाईपलाईन तपासतात त्यावेळे पुरते पाणी व्यवस्थित येते परत ये रे माझ्या मागल्या असे होतांना दिसून येते.
सोसायटी पदाधिकारी यांना आपल्या सोसायटीची पाइपलाइन ही फार पूर्वीची आहे किंवा तिचा व्यास छोटा आहे तो मोठा करून घ्या. पाणीच्या मीटर जवळ घाण अडकली आहे त्यामुळे पाणी कमी येते. पाइपलाइन वरती आहे खाली करून घ्या म्हणजे पाणीपुरवठा सुरळीत होईल, अशा सूचना कार्यकारी अभियंता पाणी पुरवठा विभागाकडून दिल्या जातात.
वरील सर्व प्रकारात काहीतरी गौडबंगाल आहे असे सोसायटीच्या रहिवाश्यांना वाटते कारण काही महिन्यांपूर्वी सदर पाईपलाईन मधून सुरळीत पाणीपुरवठा होत होता. विभागामार्फत सांगण्यात येते की पाणीपुरवठा सुरळीत आहे मग तो कुठे गायब होतो सोसायटीत येईपर्यंत हा प्रश्न आहे. विभागाकडून सोसायट्यांची होणारी फसवणूक, लुबाडणूक त्वरित थांबवावी, अशी मागणी नगरसेविका पाटील यांनी केली आहे.