
उरण ः वार्ताहर
कोविड नियंत्रणासाठी तसेच मृत्यूदर कमी करण्यासाठी कोविडमुक्त महाराष्ट्र मोहीम राबविण्यात येत आहे. उरण नगर परिषदेच्या वतीने नुकतेच उरण नगर परिषद नगराध्यक्ष सायली म्हात्रे यांनी नगर परिषद हद्दीत सर्वेक्षण करण्याच्या मोहिमेचे उद्घाटन केले.
या वेळी नगराध्यक्ष सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविन कोळी, गटनेते रवी भोईर, भाजप उरण शहर अध्यक्ष कौशिक शाह, मुख्याधिकारी संतोष माळी, नगर अभियंता अनुपकुमार कांबळे, अभियंता झुंबर माने, उद्यान निरीक्षक महेश लवटे, जगदिश म्हात्रे, उरण नगर परिषद कर्मचारी उपस्थित होते.
मोहिमेत पथकांची नेमणूक करून ही पथके घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणार आहेत. त्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्ष सायली म्हात्रे यांनी केले आहे.
पेण ः प्रतिनिधी
गेल्या सहा महिन्यांपासून आपण सर्वच जण कोरोना विषाणूशी लढाई लढत आहोत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांच्या आरोग्याच्या रक्षणासाठी शासन आणि प्रशासन शक्य ते सर्व प्रयत्न करीत आहेत. कोविड-19 नियंत्रणासाठी तसेच मृत्यूदर कमी करण्यासाठी कोविडमुक्त महाराष्ट्र मोहीम राज्यभरात सुरू झाली आहे. त्या अनुषंगाने पेण नगर परिषदेच्या प्रशासनातर्फे या मोहिमेचा शुभारंभ शुक्रवारी (दि. 18) आमदार रविशेठ पाटील आणि नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांच्या हस्ते कोतवाल चौकात पालिका आरोग्य पथकासमवेत करण्यात आला. या वेळी कुटुंबातील सदस्यांचे शारीरिक तापमान व ऑक्सिजन पातळी तपासून तशी नोंद करण्यात आली.

या वेळी मार्गदर्शनपर भाषणात आमदार रविशेठ पाटील यांनी कोरोना महामारीचा उपद्रव रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या वतीने ज्या उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत त्यांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आवाहन करीत या मोहित सहभागी शिक्षक, न. प. कर्मचारी, आरोग्य अधिकारी यांनी चांगले काम करून ही मोहीम यशस्वीरीत्या पार पाडावी व नागरिककांकडून या मोहिमेस चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांनी सांगितले, पेण शहरात आम्ही याअगोदर सर्व चाचण्या घेतल्या. आता ही मोहीम राबविण्यात येत असून यासाठी नगर परिषदेचा संपूर्ण कर्मचारी विभाग यात सक्रिय आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करेन हा सार्थ विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त करून नागरिकांनीही या मोहिमेत सहभाग घेऊन कर्मचार्यांना सहकार्य करावे, असे सांगितले.

या मोहिमेच्या शुभारंभप्रसंगी मुख्याधिकारी अर्चना दिवे, गटनेते अनिरुद्ध पाटील, बांधकाम सभापती राजेंद्र म्हात्रे, नगरसेविका शहेनाज मुजावर, नगरसेवक निवृत्ती पाटील, सुहास पाटील, भाजप शहर अध्यक्ष हिमांशू कोठारी, प्रशासन अधिकारी राजाराम नरुटे, आरोग्य विभाग अधिकारी अंकीता इसाळ, शिवाजी चव्हाण, रमेश देशमुख, शेखर अभंग, अभियंता बनसोडे, शेळके आदींसह पालिका कर्मचारी उपस्थित होते.