12 रिक्षा जप्त, तीन आरोपींना अटक; माणगाव पोलिसांची कामगिरी
माणगाव : प्रतिनिधी
चोरीच्या रिक्षा विकून फसवणूक करणार्या टोळीतील तिघाजणांना माणगाव पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून एकूण 12 ऑटोरिक्षा जप्त करण्यात आल्या असल्याची माहिती माणगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी मंगळवारी (दि.13) पत्रकार परिषदेत दिली. माणगाव उतेखोलवाडी येथील प्रवीण प्रदीप मोने (वय 36) यांनी गावातील अमित सुरेश बुटे (वय 36) याच्याकडून जुनी रिक्षा विकत घेतली होती. या सदर रिक्षेचा नंबर व कागदपत्रांबाबत प्रवीण यांनी अमित याच्याकडे विचारणा केली असता त्याने रिक्षेची कागदपत्रे दिली नाहीत. तसेच तो संपर्क करण्यास टाळाटाळ करू लागला. त्यामुळे प्रवीण मोने यांनी दिलेल्या तक्रारीवरून सुरेश बुटे याच्यावर बुधवारी (दि. 7) माणगाव पोलीस ठाण्यात भादवि कलम 406,420 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी अमित सुरेश बुटे याला ताब्यात घेतले. अधिक चौकशीत त्याने सांगितले की, योगेश फाटू गोरेगावकर उर्फ लारा (वय 39, रा. रबाळे नवी मुंबई), केतन राजू जाधव (वय 23, रा. रबाळे, नवी मुंबई, मूळ रा. ऐरोली, नवी मुंबई) आणि अतिष दिलीप पाटील (वय 36, रा. राबाडे गाव, नवी मुंबई) हे रिक्षाची चोरी करून त्या रिक्षा अमित बुटे याला देत होते. बुटे या रिक्षा माणगाव येथील लोकांना विकून त्यांची फसवणूक करीत असे. या प्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यातही गुन्हे दाखल आहेत. सदर गुन्ह्यामध्ये आतापर्यंत अमित सुरेश बुटे, केतन राजू जाधव, अतिष दिलीप पाटील यांना माणगाव पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून एकूण चार लाख 34 हजार (मूळ किंमत 12 लाख) किंमतीच्या 12 रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कामगिरी सहाय्यक निरीक्षक सतिष आस्वर, पोलीस हवालदार रावसाहेब कोळेकर, पोलीस नाईक अल्पेश पवार, पोलीस शिपाई अनिल रिठे, अमोल पोंधे, नाथा दहिफळे, संजीव सुरवसे, निखिल सूर्ते यांच्या पथकाने केली. माणगाव पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक होत आहे.
सरकारी अधिकारी असल्याचे सांगून दागिने पळविणार्या महिलेस अटक
अलिबाग : सरकारी अधिकारी असल्याचे सांगून सोन्याचे पळविणार्या महिलेस रायगड पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने (एलसीबी) अटक केली. मंगल रविंद्र मोरे उर्फ विमल श्रीकांत सुर्यवंशी (वय 54) असे या महिलेचे नाव आहे. ही महिला मुळची सातारा जिल्ह्यातील जवळी तालुक्यातील आहे. तिच्याकडून दोन लाख 85 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. तिने अलिबाग शहरामध्ये अन्य एका ठिकाणी तसेच पोयनाड परिसरामध्ये अशाच प्रकारचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. अलिबाग तालुक्यातील वेश्वी येथील महिलेने तिच्याविरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलीस अधीक्षकांनी या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे वर्ग करण्याचे आदेश दिले होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश कदम यांच्या नेतृत्वाखालील पथक या प्रकरणाचा तपास करीत होते. पोलीस हवालदार प्रशांत दबडे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे तसेच तांत्रिक विश्लेषणाव्दारे आरोपी महिलेस ताब्यात घेवून तिची चौकशी केली असता तिने गुन्ह्याची कबुली दिली. आपण सरकारी अधिकारी असून नुकतीच आपली बदली झाल्याचे सांगून ही महिला घर भाड्याने घेत असे. भाड्याच्या रूममध्ये त्याच व्यक्तीच्या नावावर नवीन टीव्ही, फ्रीज, वायफाय विकत घेत असे. गरीब, गरजूंना नोकरीस लावण्याचे अमिष दाखवून त्यांच्याकडून रोख रक्कम घेते असे. घरकाम करण्यासाठी घरी येणार्या महिलेचा संपुर्ण विश्वास संपादन केल्यानंतर दागिने गावी विसरलेले असून तुमचे दागिने द्या, मी लगेच जावून येते, असे सांगून ही महिला सोन्याचे दागिने घेवून पलायन करीत असे. एलसीबीने या महिलेला अटक केली. अलिबाग, लोणावळा (जि. पुणे), बर्दापूर (बीड) तसेच लातूर जिल्ह्यातील मुरूड या ठिकाणी अशाच प्रकारचे गुन्हे केल्याची कबुली या महिलेने दिली आहे. रायगडचे पोलीस अधीक्षक अशोक दुधे, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रायगडचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश कदम, सहाय्यक फौजदार दीपक मोरे, हवालदार प्रशांत दबडे, अमोल खंडारे, अमोल हंबीर, अभियंती मोकल, सायबर सेल पोलीस शिपाई अक्षय पाटील व तुषार घरत यांनी आरोपी महिलेला अटक केली.