Breaking News

उरणमध्ये 7.41 कोटींचा रक्तचंदन साठा जप्त

उरण : प्रतिनिधी
उरण तालुक्यातील कोप्रोली येथील ग्लोबीकॉन लॉजिस्टिक्सच्या गोदामातून तस्करीच्या मार्गाने दुबईत पाठविण्याच्या तयारीत असलेला साडेअठरा मेट्रिक टन रक्तचंदनाचा साठा जप्त करण्यात आला आहे. महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) मुंबई विभागीय पथकाने जप्त केलेल्या या रक्तचंदनाच्या साठ्याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सात कोटी 41 लाखांच्या घरात आहे. या प्रकरणी उत्तर प्रदेशातून एका संशयिताला अटक करण्यात आली आहे.
कोप्रोली येथील ग्लोबीकॉन लॉजिस्टिक्सच्या गोदामात एका कार्गो कंटेनरमध्ये हॅण्डीक्रॉफ्ट स्टील मेटलच्या नावाखाली 18.50 मेट्रिक टन वजनाचा रक्तचंदनाचा साठा लपवून ठेवण्यात आला होता. हे चंदन बनावट कागदपत्रांच्या आधारे संयुक्त अरब अमिरात (यूएई)मधील दुबई येथील जेबल अली पोर्टमध्ये पाठविण्यात येणार होते. त्यानंतर त्या बंदरातून दुसर्‍या एका ठिकाणी पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
मुंबई डीआरआय विभागाच्या अधिकार्‍यांना रक्तचंदनाच्या तस्करीची खबर्‍यांकडून कुणकुण लागली होती. खात्रीलायक माहिती मिळाल्यानंतर चार दिवसांपूर्वी डीआरआय अधिकार्‍यांनी धाड टाकून संशयित कंटेनर ताब्यात घेऊन तपासणी करण्यास सुरुवात केली. या तपासणीत सात कोटी 41 लाख किमतीचे रक्तचंदनाचे घबाड सापडले.
अधिक चौकशीनंतर या प्रकरणाचे धागेदोरे उत्तर प्रदेशात असल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी तेथूून एका संशयिताला अटक करण्यात आली आहे. तपासाअंती या तस्करीशी संबंधित असलेल्या आणखी काही संशयितांचा डीआरआयच्या अधिकार्‍यांकडून शोध घेतला जात आहे.

Check Also

तब्बल 33 वर्षांपासून फरार असलेला खुनी पती गजाआड

पनवेल : वार्ताहर पत्नीला जिवंत जाळून फरार झालेला आरोपीचा तब्बल 33 वर्षांनंतर छडा लागला आहे. …

Leave a Reply