Breaking News

मराठा आरक्षणासाठी ठिय्या; मुंबईत एकाच वेळी 20 ठिकाणी आंदोलन; महाविकास आघाडी सरकारचा तीव्र निषेध

मुंबई : प्रतिनिधी

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर महाराष्ट्रात मराठा संघटनांचे जोरदार आंदोलन सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने रविवारी (दि. 20) मुंबईत एकाच वेळी वेगवेगळ्या 20 ठिकाणी ठिय्या आंदोलन करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग आणि इतर खबरदारी घेत आंदोलन झाले. या वेळी महाविकास आघाडी सरकारच्या कुचकामी कारभाराचा तीव्र निषेध करण्यात आला. मुंबईतील कुर्ला, वडाळा, चेंबूर, मानखुर्द, वरळी, वांद्रे, बोरिवली, कांदिवली, विक्रोळी, घाटकोपर, मुलुंड आदी महत्त्वाच्या ठिकाणी आंदोलन करण्यात आले. या वेळी अनेक कार्यकर्ते रस्त्यावर बसून घोषणाबाजी करताना पाहायला मिळाले. हातात भगवे झेंडे, फलक आणि काळ्या रिबीन लावून कार्यकर्त्यांनी राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण मिळावे, अशी एकमुखी मागणी आंदोलकांनी केली. सध्याचे आंदोलन शांततेच्या मार्गाने सुरू आहे, पण जर मागणी मान्य झाली नाही तर आम्ही आंदोलनाचे स्वरूप तीव्र करू, असा इशारा या वेळी देण्यात आला.

एक मराठा, लाख मराठा!

मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने रविवारी करण्यात आलेल्या आंदोलनात ‘एक मराठा, लाख मराठा’ ही घोषणा पुन्हा एकदा निनादली. या घोषणेने मागच्या वेळी संपूर्ण महाराष्ट्र दणाणला होता. मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळाल्यानंतर मराठा समाजात संताप व्यक्त केला जात आहे. ठाकरे सरकार मराठा समाजाची बाजू न्यायालयात सक्षमपणे मांडण्यास कमी पडल्याचा आरोपही होत आहे. त्यामुळे मराठा समाज ताकदीने एकवटला आहे.

धनगर समाजही रस्त्यावर उतरणार

एकीकडे राज्यात मराठा समाज आरक्षणाच्या मागणीवर आंदोलन करीत असताना आता दुसरीकडे धनगर समाजही आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहे. धनगर समाजातील प्रमुख नेत्यांची शनिवारी (दि. 19) बैठक झाली. या बैठकीत 21 सप्टेंबरपासून धनगर समाजाच्या मागण्यांसाठी राज्यभर आंदोलन उभारण्याचे निश्चित करण्यात

आले आहे. याबाबत धनगर समाजाचे नेते प्रकाश शेंडगे यांनी सांगितले की, धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न अनेक वर्षे प्रलंबित आहे. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी ठाकरे सरकारने अध्यादेश काढून धनगरांना अनुसूचित जमातीचे आरक्षण लागू करावे, या मागणीसाठी 21 सप्टेंबरपासून राज्यभरात आंदोलन करण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात, तालुका पातळीवर आंदोलन करण्यात येईल.

Check Also

उरणमधील ‘उबाठा’, शेकापचे कार्यकर्ते भाजपमध्ये

आमदार महेश बालदी यांच्याकडून स्वागत उरण : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेना उद्धव बाळासाहेब …

Leave a Reply