Breaking News

पोषण अभियानात ‘दिशा’चा सहभाग

कर्जत ः बातमीदार

केंद्र व राज्य सरकारच्या वेगवेगळ्या विभागांच्या माध्यमातून स्थानिक स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने देशभरात पोषण महिना अभियान राबविले जात आहे. रायगडमध्ये दिशा केंद्र ही स्वयंसेवी संस्था हे अभियान राबवत असून गाव पातळीवर विशेषतः आदिवासीवाडी, पाडे व वस्त्यांवर जाऊन कुपोषण, सुपोषण आणि बालसंगोपन तसेच बालसंरक्षणासह आरोग्य शिक्षणावर सप्टेंबर महिन्यात साजरा होत असलेल्या पोषण आहार महिना अभियानात भर देत जनजागृती केली जात आहे.

केंद्राच्या महिला बालविकास विभागाच्या वतीने राबविण्यात येणार्‍या चाइल्ड लाइन 1098 प्रकल्पासाठी जिल्हा समन्वय संस्था कर्जत येथील दिशा केंद्र ही स्वयंसेवी संस्था काम करीत आहे. प्रकल्पाच्या वतीने अलिबाग व कर्जत तालुक्यातील आदिवासी वाड्यांवर जाऊन दिशाचे कार्यकर्ते अभियान राबवून जनजागृती करीत आहे. आदिवासी भागात मोठ्या प्रमाणात कुपोषण आढळते. त्यामुळे आदिवासी भागातील या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी राज्याच्या आदिवासी विकास विभागाच्या वतीने कम्युनिटी अ‍ॅक्शन फॉर न्युट्रिशन-कॅन प्रक्रिया प्रकल्प राबविला जात आहे. आदिवासी भागातील 40 अंगणवाड्यांत दिशा केंद्राच्या समन्वयाने हा प्रकल्प राबवला जात आहे. केंद्रीय समाजकल्याण बोर्डाच्या मान्यतेने महिलांना मदतीसाठी सोबतीण कुटुंब सल्ला केंद्रदेखील चालविले जात आहे.

दिशाचे कार्यकर्ते बाळाच्या जन्मापासून पुढील एक हजार दिवसांत घ्यावयाच्या काळजीविषयी जनजागृती करीत आहेत. स्तनपान, गरोदरपणातील काळजी तसेच नवजात शिशूबाबतही मार्गदर्शन केले जाते. आरोग्याबाबत पोस्टर प्रदर्शन, गाणी, गाव बैठकांतून जनजागृती केली जाते. 1 ते 30 सप्टेंबरदरम्यान मोहिमेच्या माध्यमातून लोकशिक्षण दिले जात आहे, अशी माहिती दिशाचे कार्यक्रम समन्वयक अशोक जंगले यांनी दिली. या मोहिमेत चाइल्ड लाइनच्या वैष्णवी दभडे, रेखा भालेराव, अमोल जाधव, कविता सूर्यवंशी, वैजयंती श्रीखंडे, आकेश ब्रीजे, स्वप्नाली थळे काम करीत आहेत. केंद्राच्या कॅन प्रकल्पात विमल देशमुख, रवी भोई, तर कुटुंब सल्ला सहाय्य केंद्रात समुपदेशिका माधुरी कराळे, नेहा कडव, आरोग्यसेवांवर देखरेख प्रकल्पाचे उज्जैन सिरसाठे, अनिता जाधव, रूषाली देशमुख आदी कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.

Check Also

केंद्र सरकार पाच वर्ष टिकेल -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत ः प्रतिनिधी मला या निवडणुकीत खूप काही शिकता आले. विरोधकांनी जाती जातीत तेढ निर्माण …

Leave a Reply