Breaking News

कृषी सचिव शेताच्या बांधावर; निली इनपुट्स प्रकल्पाला भेट

कर्जत ः बातमीदार, प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांनी नुकतीच वदप येथील शेतकरी-शास्त्रज्ञ मंचाचे सदस्य निलिकेश दळवी यांच्या निली इनपुट्स या शेती अवजारे बनविणार्‍या लघु कारखान्याला ठाणे विभागीय कृषी सहसंचालक विकास पाटील, अलिबाग येथील कृषी उपसंचालक दत्तात्रय काळभोर यांच्यासह भेट देऊन सर्वांनाच आश्चर्याचा सुखद धक्का दिला. या वेळी त्यांनी शेतीसाठी बहुपयोगी छोटे यंत्र तयार करण्याचा सल्ला दळवी यांना दिला. जिल्ह्यातील कृषी अभियांत्रिकी क्षेत्रात आपला आगळावेगळा ठसा उमटवणारे व भारतीय कृषी अनुसंधान परिषदेतर्फे नावीन्यपूर्ण शेतकरी पुरस्कार मिळविणारे स्व. बाळ दळवी यांचे चिरंजीव अनुक्रमे निलिकेश व नयनिश तसेच भाऊ कैलास दळवी हे दमदारपणे त्यांचा वारसा चालवत आहेत. भातशेती कष्टाची व खर्चाची असून मजुरांची वानवा, मजुरीचे वाढते दर लक्षात घेता आतबट्ट्याची झाल्याने ती सर्वसामान्य शेतकर्‍याला आर्थिकदृष्ट्या परवडण्यासाठी दळवी कुटुंबीयांनी आपले कौशल्य पणाला लावून विविध किफायतशीर यंत्रांची निर्मिती केली आहे. त्यात भातशेतीत लावणी न करता सरळ सुधारित ड्रम सीडरने पेरणी केल्यास हेक्टरी 23 मजुरांची बचत होऊन फायदेशीर शेती करता येते. हे सप्रमाण सिद्ध केले आहे. त्याचप्रमाणे पॉवरटिलरला जोडता येणारे व अन्य कंपन्यांच्या यंत्रापेक्षा तुलनेने अधिक पेंढा देणारे भात कापणी यंत्र विकसित करून त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. ही दोन्ही यंत्रे शेतकर्‍यांसाठी वरदान ठरत असून त्याची प्रत्यक्षात पाहणी करण्यासाठी कृषी सचिव एकनाथ डवले यांनी भेट दिल्याचे बोलले जाते. या वेळी निलिकेश दळवी यांनी स्वतः तयार केलेल्या विविध यंत्रांद्वारे घेतलेल्या प्रात्यक्षिकाच्या क्लिप्स मान्यवरांना संगणकावर दाखविल्या. सदर यंत्राद्वारे भात, सोयाबीन, मका, ज्वारी, बाजरी आदी पिकांची कापणी कशी यशस्वीरीत्या करता येते हे दळवी यांनी पटवून दिले. दळवी यांच्या नावीन्यपूर्ण यंत्रनिर्मितीची त्यांनी मुक्तकंठाने प्रशंसा केली. शेतकर्‍यांना विविध कामांना उपयोगी पडेल, जनरेटर लावता येईल असे अधिक सोयीचे एकच यंत्र बनविण्याचा सल्ला एकनाथ डवले यांनी दिला. शेतकर्‍यांना अवजारांची गरज असल्याने दळवीनिर्मित यंत्रांना योजनेत सामावून घेण्याबाबतची शिफारस विकास पाटील यांनी डवले यांना केली. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाची मान्यता कापणी यंत्राला मिळण्यासाठी पाठपुरावा करू, असे डवले यांनी आश्वस्त केले. या वेळी निली इनपुट्सचे तंत्रज्ञान सहकारी धनंजय गांगल, शेतकरी अ‍ॅड. अजित पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply