Breaking News

विरोधक ना शेतकर्‍यांसोबत आहेत, ना जवानांसोबत

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हल्लाबोल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
कृषी कायद्याला विरोध करणार्‍या विरोधकांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निशाणा साधला आहे. विरोधी पक्ष केवळ विरोधासाठी विरोध करीत आहेत. केंद्र सरकार देशातील शेतकर्‍यांना अधिकार देत असतानादेखील ही मंडळी विरोध करू लागली आहेत. यापूर्वी विरोधी पक्षांनी राम मंदिराच्या भूमिपूजनालाही विरोध केला होता. विरोधक ना शेतकर्‍यांसोबत आहेत, ना जवानांसोबत, अशा शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी विरोधी पक्षांवर टीका केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमामी गंगे प्रकल्पातंर्गत उत्तराखंडमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून देशातील पहिल्या चार मजली सांडपाणी प्रक्रिया केंद्राचे उद्घाटन केले. त्या वेळी ते बोलत होते.
पंतप्रधान मोदी म्हणाले, विरोधक आज किमान आधारभूत किमतीबाबतही (एमएसपी) लोकांमध्ये संभ्रम पसरवत आहेत. देशात एमएसपीदेखील राहील आणि शेतकर्‍यांना देशात कोणत्याही ठिकाणी आपले पीक विकण्याचे स्वातंत्र्य असेल, मात्र हे स्वातंत्र्य काही लोकांना सहन होत नाहीये. नव्या कायद्यामुळे यांच्या काळ्या कमाईचा मार्गच बंद झालेला आहे. याचमुळे विरोधक त्रस्त असल्याची कोपरखळीही त्यांनी मारली.
ट्रॅक्टरला आग लावून शेतकर्‍यांचा अपमान
शेतकरी ज्याची पूजा करतात त्या मशीन आणि उपकरणांची जाळपोळ करून विरोधक शेतकर्‍यांचा अपमान करीत आहेत. देशातील शेतकर्‍याने खुल्या बाजारात आपले पीक विकू नये असेच विरोधी पक्षाला वाटत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वेळी म्हटले. आम्ही एमएसपी लागू करू असे हे लोक अनेक वर्षे बोलत राहिले, मात्र त्यांनी लागू केलाच नाही, पण एमएसपी लागू करण्याचे काम स्वामीनाथन आयोगाच्या इच्छेनुसार आमच्या सरकारने केले, याचाही पुनरूच्चार पंतप्रधान मोदींनी केला.

Check Also

सर्वांनी शिवरायांचे विचार जगायला हवेत -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तछत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती गव्हाण यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती …

Leave a Reply