राज्य शासनाविरोधात अनोखे आंदोलन
खोपोली : प्रतिनिधी
खावटी योजना आदिवासी जगवायला की मारायला असा संतप्त सवाल करीत श्रमजीवी संघटनेने मंगळवारी (दि. 29) खालापूर तहसील कार्यालय आवारात राज्य शासनाच्या आदिवासी विभागाचे उत्तरकार्य केले.
कोरोना संसर्गात जनजीवन ढवळून गेले आहे. हातावर पोट असलेला आदिवासी समाजदेखील त्यातून सुटलेला नाही. राज्य शासनाने 9 सप्टेंबर 2020 रोजी परिपत्रक काढून आदिवासी विभागाला खावटी अनुदान योजना तयार केली, मात्र अद्याप आदिवासींना खावटी मिळाली नाही. केवळ याद्या बनविणे आणि सर्व्हेक्षण सुरू असून, त्यात कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी आदिवासी विभागाने केल्याच आरोप श्रमजीवी संघटनेने केला आहे.
आदिवासी समाजाबाबत होत असलेल्या असंवेदनशील धोरणाचा निषेध करण्यासाठी मंगळवारी खालापूर तहसील कार्यालयाच्या आवारात श्रमजीवी संघटनेच्या खालापूर तालुका महिला अध्यक्ष हिरा पवार यांचे नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. या आंदोलनास मोजके कार्यकर्ते सामाजिक अंतर पाळून उपस्थित होते. उत्तरकार्याच्या कार्यक्रमानंतर तहसीलदार इरेश चप्पलवार यांना निवेदन देण्यात आले.