दादर, हमरापूर भागात महायुतीचा झंझावाती प्रचार; मतदारांत उत्साह
पेण : प्रतिनिधी
राज्यात पुन्हा एकदा भाजप-शिवसेना महायुतीचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. त्यामुळे खोटी आश्वासने देणार्या विरोधकांना मत देऊन ते फुकट घालवू नका, असे आवाहन पेण विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार रविशेठ पाटील यांनी मतदारांना केले. महायुतीचे उमेदवार माजी मंत्री रविशेठ पाटील यांनी हमरापूर, जोहे, कळवे, दादर, उर्णोली, वरेडी, सापोली, हनुमानपाडा, डावरे, कोपर विभागातील सर्व गावांमध्ये झंझावाती प्रचार दौरा केला. या वेळी ठिकठिकाणी झालेल्या सभेत ते बोलत होते. मतदारसंघाच्या विकासासाठी आता मला सर्वांचा पाठिंबा हवा आहे. गेल्या 10 वर्षांत पेण विधानसभा मतदारसंघ विकासाच्या दृष्टीने मागे राहिला असून, मतदारसंघाच्या विकासासाठी आता मला सर्वांचा पाठिंबा हवा आहे, असे त्यांनी या वेळी सांगितले. शिवसेना उपजिल्हाध्यक्ष नरेश गावंड, तालुकाप्रमुख नरेश गावंड, भाजप तालुकाध्यक्ष गंगाधर पाटील, माजी जि. प. सदस्या कौसल्या पाटील, पेणच्या नगराध्यक्षा प्रीतम पाटील, व्ही. बी. पाटील, यशवंत घासे, अॅड. विलास पाटील, दादर सरपंच विजय पाटील, हमरापूर सरपंच प्रदीप म्हात्रे, कोपर सरपंच नवनाथ म्हात्रे आदींसह भाजप, शिवसेना व मित्रपक्षाचे कार्यकर्ते प्रचार दौर्यात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हमरापूर विभागात गणेश मूर्तिकार संघटना, हातपाटी रेती व्यावसायिक यांची मोठी संघटनात्मक ताकद असून रविशेठ पाटील यांना मानणारा मोठा वर्ग आहे. या ठिकाणी त्यांना प्रचंड मताधिक्क्य मिळेल, अशी हवा प्रचार दौर्यात दिसून आली.