300 अधिकारी, कर्मचारी सहभागी
अलिबाग : प्रतिनिधी
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त रायगड जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. रविवारी (दि. 14) रायगड पोलीस दलातर्फे अमृत महोत्सवी दौडचे आयोजन करण्यात आले होते. यात पुरूष गटात अमोल कदम, महिला गटात समीना पटेत तर विशेष प्राविण्य गटात निलेश नाईक यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.
अलिबाग येथील पोलीस अधिक्षक कार्यालयापासून या दौडला प्रारंभ झाला. अलिबाग शहरातील मारूती नाका, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, जोगळेकर नाका, चेंढरे बायपास, नागडोंगरी, बुरूमखाण, वरसोली, अलिबाग कुंभारवाडा मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, महावीर चौक, ब्राहमण आळीमार्गे पुन्हा पोलीस अधिक्षक कार्यालय येथे दौडची सांगता झाली. जवळपास 300 पोलीस अधिकारी कर्मचारी या दौडमध्ये सहभागी झाले होते. अपर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे, महसूल तहसीलदार सचिन शेजाळ यांनी ही 10 किलोमीटरची दौड पूर्ण केली.
दौडमध्ये महिला गटात समीना पटेल (पाली) यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. नवप्रविष्ट शिपाई अक्षता मोरे यांनी दुसरा तर सरिता मुकणे यांनी तिसरा क्रमांक मिळवला. पुरूषांमध्ये नवप्रविष्ट पोलीस शिपाइ्र अमोल कदम याने प्रथम क्रमांक पटकावला. करण पाटील (मांडवा) यांनी दुसरा तर किरण शिंदे (मुख्यालय) यांनी तृतीय क्रमांक मिळवला. विशेष प्राविण्य गटात निलेश नाईक (प्रथम) ,जगदीश काठे (व्दितीय) तर प्रकाश सकपाळ (तृतीय) हे विजेते ठरले.