Breaking News

ऐतिहासिक निवाडा

शेकडो साक्षी-पुरावे, हजारो कागदपत्रे, आणि असंख्य तारखा खर्ची पडल्यानंतर सीबीआयच्या विशेष न्यायालयाने लखनौमध्ये बुधवारी अखेर ऐतिहासिक निवाडा दिला. या निवाड्यानुसार विवादित बाबरी मशीद पाडण्याप्रकरणीच्या सर्वच्या सर्व 32 आरोपींना पुराव्याअभावी निर्दोष ठरवण्यात आले. या निकालामुळे भारतातील तमाम हिंदू धर्मियांना आनंदाचे भरते येणे साहजिकच होते. कारण हा दिवस पाहण्यासाठी त्यांना प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली आहे.

तब्बल 28 वर्षांनंतर बाबरी मशीद पाडण्याप्रकरणीच्या खटल्याचा निकाल लागला आणि देशभरातील हिंदू धर्मियांनी ऐन कोरोना महामारीच्या संकटकाळात एकच जल्लोश केला. या महामारीचे संकट आज नसते तर देशभर दिवाळी साजरी झाली असती. 6 डिसेंबर 1992 रोजी लाखो कारसेवकांनी उत्स्फूर्तपणे अयोध्येकडे कूच करत विवादित बाबरी मशिदीचा ढाचा जमिनदोस्त केला, तो क्षण भारतीय इतिहासाला कलाटणी देणारा ठरला. लांगुलचालनाचे राजकारण करून वर्षानुवर्षे खुर्ची बळकावणार्‍या काँग्रेसी राजवटीला ही सणसणीत चपराक होती. कारसेवकांनी दाखवलेल्या मर्दुमकीचे पोवाडे गायले गेले. दिल्लीतील राजवटी बदलल्या. इतकेच नव्हे तर, भारतीयांची विचारधारा देखील अधिक स्पष्ट आणि ठळक होत गेली. परंतु 28 वर्षे या खटल्याचा निकाल लागू शकला नाही. भारतीय जनता पक्षाचे एक संस्थापक लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री कल्याण सिंह, विश्व हिंदू परिषदेचे प्रमुख स्वर्गीय अशोक सिंघल, मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री सुश्री उमा भारती, साध्वी ऋतंभरा, विनय कटियार अशा दिग्गज नेत्यांना सीबीआयने कोर्टात खेचले व कट-कारस्थान करून बाबरी मशिदीचा विवादित ढाचा पाडून टाकल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला. विवादित बाबरी ढाचाच्या जागीच श्रीरामलल्ला विराजमान यांचे जन्मस्थळ आहे ही बाब श्रीराम जन्मभूमीच्या वेगळ्या निवाड्यामध्ये अधोरेखित झालीच होती. रामजन्मभूमीबाबतचा खटला हा मुलकी स्वरुपाचा होता. विवादित ढाचा पाडण्यासंदर्भातला खटला हा फौजदारी होता. या फौजदारी खटल्यातून लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी आदी सारे जण निर्दोष सुटल्याने विरोधकांचा तिळपापड होणे हे देखील स्वाभाविक मानावे लागेल. या मंडळींनी बाबरी मशीद पाडली नाही तर मग ती जादूने पडली का, असा जळजळीत सवाल एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांनी केला आहे. काँग्रेसने देखील या निकालाबद्दल जळफळाट व्यक्त केला आहे. तथापि, विवादित ढाचा पाडण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी कारसेवकांना चिथावल्याचा एकही पुरावा तपास यंत्रणांच्या हाती लागलेला नाही याकडे विशेष न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. के. यादव यांनी लक्ष वेधले आहे. बाबरी मशिदीच्या विवादित ढाचाच्या जागी आता लवकरच भव्य राम मंदिर उभारले जाईल व तेथे रामभक्तांची रीघ लागेल. या राममंदिराच्या उभारणीसाठी लक्षावधी लोकांनी कडवा संघर्ष केला आहे. याची जाणीव आपण सार्‍यांनीच ठेवायला हवी. किंबहुना, तमाम हिंदु धर्मियांच्या अस्मितेचे एक प्रतीक म्हणूनच हे भव्य राममंदिर उभे राहणार आहे. बुधवारी लागलेल्या निवाड्यानंतर भाजपचे वयोवृद्ध नेते लालकृष्ण अडवाणी यांनी जय श्रीराम असा नारा देत निवाड्याबद्धल समाधान व्यक्त केले. गेल्या जवळपास तीन दशकांचा हा लढा पूर्णत्वास गेल्याची त्यांची भावना निश्चितच असेल. भाजपच्या या दिग्गज नेत्यांच्या मनात कृतार्थतेची भावना असली तरी तमाम भारतीयांच्या मनामध्ये त्यांच्याप्रती कृतज्ञतेची भावना असायला हवी.

Check Also

जाहीर धुव्वा

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन शुक्रवारी संपले. या संपूर्ण अधिवेशनाच्या काळात विरोधी पक्षाचे नेते पूर्णत: निष्प्रभ झालेले …

Leave a Reply