पनवेल : बातमीदार


सकारात्मक विचारसरणी हीच उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली असल्याचे प्रतिपादन आहार तज्ज्ञ डॉ. सुरज मढवी यांनी पनवेल येथे केले.
पनवेल येथील रयत शिक्षण संस्थेच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयामध्ये स्टाफ अकादमी व हेल्थ सेंटर यांच्या संयुक्त माध्यमातून डॉ. सुरज मढवी यांचे आहार विहार व अध्यात्म या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करणेत आले होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. गणेश ठाकूर हे होते.
डॉ सुरज मढवी यांनी आपल्या व्याख्यानामध्ये भारतीय संस्कृतीमध्येआयुर्वेदास असणारे महत्व विषद करीत आयुर्वेदच खर्या अर्थाने मानवास उत्तम आरोग्य देऊ शकते. आयुर्वेद, योग व अध्यात्म याचा घनिष्ठ संबंध असून याचे महत्व हळूहळू सर्व जगाला पटू लागले आहे. आरोग्य हे आहार, विहार, आचार व विचार यावर अवलंबून असून सकारत्मक विचार व्यक्तीस आरोग्यदायी जीवन जगण्यास मदत करतो, असे मत मढवी यांनी व्यक्त केले.
अकादमीचे चेअरमन डॉ. पांडुरंग भोसले यांनी वक्त्यांची ओळख करून देत आजच्या धगधगीच्या काळामध्ये व्यक्ती स्वतःला विसरत जाऊन आरोग्याची कशी हेळसांड करतो आहे हे सांगत आज अशा प्रकारच्या तज्ञ व्याख्यानांची आवश्यकता का आहे हे सांगितले. तसेच डॉ. सुरज मढवी यांची ओळख करून देत ते महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असून महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. एच. आर. मढवी यांचे ते चिरंजीव आहेत. याचा सर्वांना रास्त अभिमान आहे असे सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. गणेश ठाकूर यांनी डॉ सुरज मढवी हे आपल्या सहवासामध्ये घडले असल्याचा आपणास रास्त अभिमान आहे असे सांगत डॉ. मढवी हे आज अनेक ठिकाणी आरोग्यावरती मोफत व्याख्याने देऊन सदृढ समाज घडविण्याचे मोलाचे काम करीत त्याची उत्तरोत्तर अशीच प्रगती होवो, असे मत त्यांनी व्यक्त केले.
या वेळी उपप्राचार्य डॉ. अशोक आढाव, उपप्राचार्य प्रा. जी. जे. कोराणे, उपप्राचार्य प्रा. भस्मे, अधीक्षक एस. के. गायकवाड, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. प्रफुल्ल वशेनिकर यांनी केले. आभार प्रा. उदावंत यांनी मानले.