Breaking News

राज्य सरकारविरोधात पार्थ पवारांचे बंड

सुप्रीम कोर्टात जाण्याचा इशारा

मुंबई ः प्रतिनिधी
सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला स्थगिती दिल्यामुळे ठाकरे सरकारवर चोहोबाजूने टीकेची झोड उठली आहे, तर दुसरीकडे ठाकरे सरकारकडून तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले जात आहे. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू पार्थ पवार यांनी पुन्हा एकदा सरकारविरोधात बंड पुकारत मराठा आरक्षणावरून सुप्रीम कोर्टात जाण्याशिवाय दुसरा पर्याय शिल्लक नसल्याचे म्हटले आहे. या वेळी त्यांनी याबाबत लवकरात लवकर तोडगा काढावा, अशी विनंतीही सरकारकडे केली. बीडमध्ये मराठा आरक्षणासाठी तरुणाने आत्महत्या केल्यानंतर पार्थ पवार आक्रमक झाल्याचे दिसत आहे. पार्थ पवार यांनी ट्विट करीत आपले म्हणणे मांडले आहे.
मराठा आरक्षणासाठी विवेक नामक एका तरुणाने आत्महत्या केल्याची बातमी ऐकून धक्का बसला आहे. अशा दुर्दैवी घटनांची मालिका सुरू होण्याआधी मराठा नेत्यांनी जागे व्हावे आणि लढावे. महाराष्ट्र सरकारने तोडगा काढण्यासाठी पावले उचलावीत अशी विनंती आहे, असे पार्थ पवार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. पार्थ पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये आत्महत्या केलेल्या तरुणाचा आणि त्याने लिहिलेल्या पत्राचा फोटोही शेअर केला आहे.
पार्थ पवार यांनी म्हटले की, विवेकच्या आत्महत्येने आमच्या मनात जी आग पेटवली आहे, त्याने संपूर्ण व्यवस्था खाक होऊ शकते. संपूर्ण पिढीचे भविष्य धोक्यात आहे. सुप्रीम कोर्टात जाऊन हस्तक्षेप याचिका दाखल करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय माझ्यासमोर शिल्लक नाही, असा इशारा त्यांनी या वेळी राज्य सरकारला दिला आहे.
 दरम्यान, पार्थ पवार यांनी याबाबत न्यायालयीन लढाई लढण्याचा इशारा दिल्यानंतर राज्य सरकारच्या चिंतेत भर पडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून अद्याप पार्थ पवार यांच्या ट्विटवर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यासंदर्भात काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply