10 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक
मुंबई ः प्रतिनिधी
मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने मराठा आरक्षण संघर्ष समितीने येत्या 10 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. 6 ऑक्टोबरला ’मातोश्री’बाहेर आंदोलन, तर 10 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंद करण्याचा इशारा मराठा संघर्ष समितीने दिला आहे. मुंबई मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयात संघर्ष समितीने पत्रकार परिषद घेतली. राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा समाजाचे आरक्षण थांबले. राज्य सरकारला येत्या 9 ऑक्टोबरपर्यंत अल्टीमेटम दिला आहे. तोपर्यंत मराठा समाजाच्या मागण्या मान्य न झाल्यास 10 तारखेला महाराष्ट्र कडकडीत बंद ठेवण्यात येणार असल्याचा इशारा मराठा समितीच्या नेत्यांनी या वेळी दिला आहे.
दरम्यान, मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गाच्या 10 टक्के आरक्षणाचा लाभ देण्याच्या आधीच्या निर्णयास राज्य शासनाने स्थगिती दिली आहे, मात्र राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार अन्य सवलती मात्र लागू करण्यात येणार आहेत. मराठा आरक्षणासंदर्भात मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले की, मराठा समाजाच्या एसईबीसी आरक्षणास सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर ईडब्ल्यूएसच्या 10 टक्के आरक्षणाचा लाभ द्यावा, अशी भूमिका शासनाने आधी घेतली होती, मात्र त्याबाबत मतभेद आहेत.
मराठा समाजाला ईडब्ल्यूएसमध्ये 10 टक्के आरक्षण देण्यात येणार नाही, मात्र ईडब्ल्यूएसच्या सर्व सवलती देण्यात येतील, असा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारच्या बैठकीतही घेण्यात आला. आरक्षणाचा लाभ वगळून अन्य सवलती देण्यास आमचा विरोध नाही, असे मराठा क्रांती मोर्चाने स्पष्ट केले आहे. राजर्षी शाहू महाराज शिक्षण शुल्क, शिष्यवृत्ती योजना, डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना, सारथीसाठी 130 कोटींचा जादाचा निधी आदींची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
संभाजी महाराज हे शाहू महाराजांचे वंशज आहेत. मुख्यमंत्र्यांनी सगळ्या संघटना एकत्र बोलावून त्यांची मते जाणून घ्यायला हवी होती, परंतु काही संघटनांचे ऐकून गैरसमज झाल्यामुळे त्यांनी मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत ते मत मांडले आहे. छत्रपती संभाजी महाराज व छत्रपती उदयनराजे यांनी मराठा समाजाचे नेतृत्व करू नये असे सामान्य मराठा म्हणून मला वाटते. मराठा समाजाचे नेतृत्व एखाद्या राजाकडे गेल्यास धनगर, ओबीसी, भटके विमुक्त, इतर समाज आले तर त्यांचेही नेतृत्व त्यांना करावे लागेल. प्रत्येक संघटना आपपल्या समाजाचे प्रश्न मांडतात. राजांनी कोणत्याही एका समाजाचे नेतृत्व न करता सर्व समाजाचे नेतृत्व राजे म्हणून ते करताहेत. त्यामुळे त्यांची भूमिका योग्य आहे. आमच्या कार्यकर्त्यांची भूमिका आम्ही पार पाडत आहोत, असे सुरेश पाटील यांनी या वेळी सांगितले.