महाड ः प्रतिनिधी
महाडमधील एका भंगाराच्या गोदामामधील बंद कारमध्ये अडकून दोन बालकांचा गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाला. सायंकाळी 7 वाजता खेळायला गेलेली मुले आली नसल्याने भयभीत झालेल्या पालकांनी महाड एमआयडीसी पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी शोध सुरू केला असता घराजवळील भंगार गोदामात उभ्या असलेल्या कारमध्ये ही दोन मुले अत्यवस्थ स्थितीत आढळली.
सोहेल जकात खान (5) आणि अब्बास जकात खान (3) अशी मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत. नांगलवाडी येथे एक भंगाराचा अड्डा आहे. येथे एक बंद कार (एमएच 4 बीके 7537) उभी होती. खेळत असताना अब्बास व सोहेल यांच्या हातून अचानक गाडीचा दरवाजा आतून लॉक झाला. दोघांनाही बंद गाडीचे दरवाजे आणि काचा उघडणे जमले नाही. त्यामुळे गाडीत गुदमरून त्यांचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती कळताच औद्योगिक वसाहत पोलिसांनी आणि साळुंके रेस्क्यू टीमचे प्रशांत साळुंके यांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही मुलांचे मृतदेह ताब्यात घेऊन विच्छेदनासाठी महाडच्या ग्रामीण रुग्णालयात नेले. या प्रकरणी औद्योगिक पोलीस ठाण्यात दोन बालकांच्या अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
Check Also
भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …