भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा आरोप
कोल्हापूर : प्रतिनिधी
शेतकर्यांच्या कर्जमाफीबाबत राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी झाली नाही. सरकारच्या अव्यवहार्य निर्णयांमुळेच शेतकर्यांना खरिपाच्या हंगामासाठी बँकांकडून कर्ज मिळत नाही,’ असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. खरिप हंगामाकरिता शेतकर्यांना तातडीने कर्जपुरवठा व्हावा, या मागणीसाठी त्यांनी सोमवारी (दि. 22) कार्यकर्त्यांसह जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना निवेदन दिले. या वेळी ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.
पावसाळा सुरू झाला तरी शेतकर्यांना नवीन कर्ज मिळत नसल्याने शेतीची कामे खोळंबली आहेत, असा आरोप करीत भाजपने राज्यभर शेतीचा कर्जपुरवठा सुरळीत सुरू व्हावा, या मागणीसाठी सोमवारी आंदोलन केले. प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात जिल्हाधिकार्यांसह बँक ऑफ इंडियाच्या अधिकार्यांना निवेदन दिले. यावेळी बोलताना ते म्हणाले, शेतकर्यांना दोन लाखापर्यंत कर्ज माफ करण्याची घोषणा मोठ्या धडाक्यात मुख्यमंत्र्यांनी केली. नियमित कर्ज भरणार्याना 50 हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम देऊ, असे सांगितले. उपमुख्यमंत्र्यांनी तर तीन महिन्यांत कर्जमाफी दिली नाही, तर नाव बदलवू अशी घोषणा केली. विधानसभेत बाके वाजली. अभिनंदन करून घेतले. प्रत्यक्षात मात्र या निर्णयांची अंमलबजावणी झाली नाही. सरकारच्या अव्यवहार्य निर्णयांमुळेच त्याची अंमलबजावणी होत नाहीए.
गरज असताना शेतकर्यांना कर्ज मिळत नाही. खरीप हंगाम सुरू होऊनही बँकांकडून कर्जपुरवठा होत नाही. सरकारने केलेल्या घोषणा पूर्ण झाल्या नाहीत. नैसर्गिक नुकसानीमध्ये कोरडवाहूला 25 हजार रुपये, तर फळबागांना 50 हजार रुपयांची घोषणा सरकार विसरले. कोकणात आपत्तीग्रस्तांना तातडीची मदत पोहोचलीच नाही. टोळधाळीच्या नुकसानीची दखलही घेतली नाही, असा आरोप आमदार पाटील यांनी केला. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे, राहुल चिकोडे, भगवान काटे आदी उपस्थित होते.