नवी दिल्ली : वृत्तसंस्था
कोरोना आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकार 24 तास काम करीत असून, जुलै 2021पर्यंत देशातील 25 कोटी लोकांना लस देण्याचे सरकारचे लक्ष्य असल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी रविवारी (दि. 4) दिली. ते संडे संवाद या कार्यक्रमात बोलत होते. संपूर्ण जगात कोरोनाचे संकट वाढत असताना यावरील लसींचेही मोठ्या प्रमाणात संशोधन सुरू आहे. भारतात कोरोना प्रतिबंधक लस कधी व कशी उपलब्ध होईल यावर माहिती देताना केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन म्हणाले की, सरकारला कोरोना लसीचे 400 ते 500 कोटी डोस प्राप्त होतील आणि यातील जुलैपर्यंत 25 कोटी लोकांना लसीकरण पूर्ण होईल असे अनुमान आहे. देशातील प्रत्येक व्यक्तीला ही लस कशी दिली जाईल ही आमची प्राथमिकता आहे. कोरोना लसीच्या संदर्भात उच्चस्तरीय तज्ज्ञांची एक समितीही कार्यरत आहे.
देशात तीन लसींवर संशोधन
कोरोनावर लस शोधण्यासाठीही जगभरात प्रयत्न सुरू आहेत. भारतात सध्या कोरोनावरील लस शोधण्याचे काम तीन कंपन्या करीत आहेत. यामध्ये भारत बायोटेक कोवॅक्सिन, झायडस कॅडिला जायकोव-डी आणि ऑक्सफर्डची कोरोना वॅक्सिन यांचा समावेश आहे. सीरम आणि ऑक्सफर्ड मिळून ही लस तयार करीत आहेत. या लसीच्या तिसर्या टप्प्यातील चाचण्या सुरू आहेत, तर इतर दोन लसींच्या चाचण्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आहेत.