Breaking News

काँग्रेस दलालांचा दलाल; कृषी कायद्यांवरून प्रकाश जावडेकरांचा हल्लाबोल

पणजी : वृत्तसंस्था

कृषी कायद्यांना विरोध करणारा काँग्रेस पक्ष दलालांचा दलाल असल्याचा आरोप केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला आहे. केंद्र सरकारने संमत केलेल्या कृषी कायद्यांसंदर्भात माहिती देण्यासाठी जावडेकर गोव्यात आले होते. त्यांनी रविवारी (दि. 4) पर्वरी येथे पत्रकार परिषद घेतली. त्या वेळी ते बोलत होते. तिन्ही कृषी कायद्यांचे समर्थन करताना जावडेकर म्हणाले की, शेतकर्‍यांची कृषी उत्पादकता वाढावी, कृषी मालाचा दर स्वतः शेतकर्‍यांना ठरविता यावा, शेतकी क्षेत्रात अधिकाधिक गुंतवणूक व्हावी, कृषीमाल निर्यातीला प्रोत्साहन मिळावे, शेतजमिनीची मालकी शेतकर्‍यांकडेच रहावी या उद्देशाने ही विधेयके संमत केलेली आहेत. या कायद्यांमुळे शेतकर्‍यांचा फायदा होईल आणि दलाल नेस्तनाबूत होतील. नवनवे तंत्रज्ञान या क्षेत्रात येईल. शेतकर्‍यांची उत्पादकता वाढेल. कृषी मालाची साठवणूक करता येईल तसेच निर्यातीवर निर्बंध राहणार नाहीत. याचबरोबर देशातून अधिकाधिक निर्यात व्हावी, अशी अपेक्षा आहे. साठेबाजीमुळे बाजारात कृषी मालाचे दर वाढणार नाहीत का या प्रश्नावर जावडेकर म्हणाले की, मुबलक उत्पादन होणार असल्याने टंचाई निर्माण होण्याचा किंवा दर वाढण्याचा प्रश्नच नाही. काँग्रेस दलालांची तळी उचलून धरीत आहे. देशात कृषी सुधारणा विधेयक आणण्यासाठी प्रस्ताव काँग्रेसचाच होता. आता या कायद्यांना जो विरोध चालला आहे तो राजकीय आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी राजकीय स्वार्थासाठी आंदोलन करीत आहेत. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आधी स्वतःच्या पक्षाचा 2014 व 2019चा लोकसभा निवडणूक जाहीरनामा तपासावा. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची भाषणे ऐकावीत. या प्रश्नावर काँग्रेस आता ’यू-टर्न’ घेत आहे, असा आरोपही त्यांनी केला.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply