मुंबई : प्रतिनिधी
मुंबईत सर्वसामान्य प्रवाशांसाठी लोकल सुरू करण्याबाबत राज्य सरकारकडून अद्याप कोणताही प्रस्ताव आला नसल्याचे रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आम जनतेला राज्य सरकार आणखी किती दिवस खडतर प्रवासासह वेळ व पैशाचा अधिक भूर्दंड देणार, असा सवाल केला जात आहे. कोरोनामुळे केवळ अत्यावश्यक सेवांसाठी काम करणार्यांना लोकलने जाण्याची मुभा आहे, मात्र सामान्य प्रवाशांना लोकलमध्ये प्रवेश नसल्याचे त्यांचे प्रचंड हाल होत आहेत. ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत राज्यात इतर अनेक निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे सर्वांसाठी लोकल सुरू केली जावी, अशी मागणी सातत्याने होत आहे. काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने मुंबईत लोकल सुरू करणार असल्याचे संकेत दिले होते, मात्र तसा प्रस्ताव आला नसल्याचे रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी म्हटले आहे. त्यामुळे राज्य सरकार सर्वसामान्य प्रवाशांना फसवतेय का, अशी चर्चा आहे.