माजी कर्णधाराकडून घरचा अहेर
लंडन : वृत्तसंस्था
तिसर्या कसोटीत भारताने इंग्लंडवर 10 गडी राखून विजय मिळवला. सामना संपल्यावर माजी इंग्लिश खेळाडूंनी खेळपट्टीसंदर्भात टिपण्णी केली, पण इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसेन याने मात्र इंग्लंडच्या फलंदाजांची तुलना भित्र्या सश्याशी करीत खडेबोल सुनावले.
‘लहानपणी अनेकांनी पान पाठीवर पडणार्या भित्र्या सशाची गोष्ट ऐकली असेल. झाडाचे पान पाठीवर पडल्यानंतर ढगफुटी झाल्याची समजूत करून घेणारा आणि सैरावैरा पळणारा ससा अशी इंग्लंडच्या फलंदाजांची अवस्था झाली होती,’ असे सांगून स्काय स्पोर्ट्सशी बोलताना नासिर हुसेन म्हणाला की, पहिल्या डावात भारताला केवळ 33 धावांची आघाडी मिळाली होती. त्यामुळे दुसर्या डावात इंग्लंडला चांगली आघाडी घेण्याची संधी होती, मात्र इंग्लंडच्या फलंदाजांची अवस्था भित्र्या सशासारखी झाली होती. ही खेळपट्टी फलंदाजीच्या दृष्टीने चेन्नईपेक्षा कठीण होती, पण 81 धावांवर संघाने बाद व्हावे इतकीही खेळपट्टी वाईट नव्हती.
अहमदाबादसारख्या खेळपट्टीवर काही चेंडू वळतात, तर काही अगदीच सरळ येतात. अशा ठिकाणी फलंदाज आपली लय गमावण्याची शक्यता अधिक असते. अशाच खेळपट्ट्यांवर पुढील कसोटी सामने खेळले गेले तर फलंदाज अधिकच बुचकळ्यात पडतील, असे विश्लेषणही हुसेनने केले.
कोहलीच्या वक्तव्यावर कूक नाराज
तिसरा कसोटी सामना अवघ्या दोन दिवसांत संपल्यानंतर अनेक दिग्गजांनी मोटेराच्या खेळपट्टीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. यामध्येच आता इंग्लंडचा माजी कर्णधार अॅलिस्टर कूक यानेही उडी घेतली आहे. कूक याने खेळपट्टीवर निशाणा तर साधलाच, याशिवाय भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या वक्तव्यावर नाराजीही व्यक्त केली. ‘चॅनल 4’सोबत बोलताना कूक म्हणाला की, विराट कोहलीने केलेली खेळपट्टीची पाठराखण पाहून मला आश्चर्य वाटले. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाप्रमाणे (बीसीसीआय) त्याने खेळपट्टीची पाठराखण केली आहे. इंग्लंडच्या फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्करली, परंतु म्हणून तुम्ही फक्त फलंदाजांवर खापर फोडू
शकत नाही. खेळपट्टी कसोटी क्रिकेटसाठी योग्य नव्हती. त्यामुळेच दोन दिवसांत निकाल लागला.
वॉनची आयसीसीवर टीका
इंग्लंडच्या पराभवाबद्दल माजी कर्णधार मायकल वॉन याने आपल्या स्तंभातून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेवर (आयसीसी) टीका केली आहे. ‘भारतासारख्या बलाढ्य देशांना जोपर्यंत आयसीसीकडून सूट मिळत राहील तोवर आयसीसीची अवस्था दात नसलेल्या श्वापदासारखी असेल. भारत हवे त्या पद्धतीने क्रिकेट खेळत आहे, खेळपट्ट्या तयार करून घेत आहे, पण त्यामुळे कसोटी क्रिकेटला त्रास होतोय हे समजले पाहिजे. भारताने तिसरी कसोटी जिंकली यात वाद नाही, मात्र तो विजय अगदीच उथळ होता. कारण त्या सामन्यात खेळ जिंकला नाही. भारताने इंग्लंडपेक्षा चांगली कामगिरी केली आणि सामना जिंकला, पण कसोटी क्रिकेटच्या दृष्टीने असे सामने फारसे योग्य नाहीत आणि आमच्यासारख्या माजी खेळाडूंनी याविरोधात आवाज उठवणे हे आमचे कर्तव्य आहे, असे रोखठोक मत डेली टेलिग्राफच्या स्तंभात वॉन याने मांडले.