पनवेल : वार्ताहर
कोरोना व्हायरसचा प्रसार होऊ नये म्हणून शासनाने लॉकडाऊन केला
असतानाही दोन टेम्पोंतून मजुरांची वाहतूक
करण्याचा प्रयत्न पोलिसांनी रविवारी
(दि. 29) रात्री पळस्पे फाटा येथील नाकांबदी पॉइंटवर हाणून पाडला. या प्रकरणी पोलिसांनी
दोन्ही वाहनचालकांवर गुन्हा दाखल केला आहे.
लॉकडाऊन असूनही लोक खासगी, मालवाहू वाहनाने गावी जात आहेत. अशाच प्रकारे काही मजूर आपल्या कुटुंबासह कंटेनर टेम्पो (एमएच 04 जेयू 5355) आणि मालवाहू टेम्पो (एमएच 43 बीजी 2043)मधून कर्नाटक आणि सातारा येथे निघाले होते. हे टेम्पो रविवारी मध्यरात्री 1.30च्या सुमारास पळस्पे फाटा येथील नाकांबदी पॉइंटवर आले असता पोलिसांकडून वाहनांची तपासणी सुरू असताना मजुरांच्या वाहतुकीचा प्रकार उघडकीस आला.
दोन टेम्पोंमधून 22 पुरुष, 25 महिला व 16 मुले असे एकूण 63 जण बेकायदेशीररीत्या प्रवास करीत
होते. या
सर्वांना पोलिसांनी सिडको एक्झिबिशन हॉल येथे नेऊन त्यांना बिस्कीट वाटप करून मंडल
अधिकारी व वैद्यकीय अधिकार्यांच्या ताब्यात दिले. त्याचप्रमाणे या अवैध वाहतूकप्रकरणी
टेम्पोचालक धनराज शिवाजी अवरादे (वय 45, रा. तोरंबा, ता. लोहारा, जि. उस्मानाबाद) आणि पांडुरंग लक्ष्मण पवार (वय 49, रा. धावडशी, ता. जि. सातारा)
यांना सीआरपीसी कलम 41प्रमाणे नोटीस देऊन सोडण्यात आलेे. या प्रकरणी पनवेल
शहर पोलीस ठाण्यात भादंवि कलम 269, 270, 271, 290, 188सह साथरोग प्रतिबंधक अधिनियम 1897चे कलम 2, 3, 4सह महाराष्ट्र
कोविड 19 उपाययोजना नियम 2020चे नियम 11सह राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005चे कलम 51ब सह मोटर वाहन
कायदा कलम 66,192 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.